गुहागर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेत कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने ऐन दिवाळीत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. अचानक मिळालेल्या या आदेशामुळे आता या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या माध्यमातून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ हयुमन शाखा रत्नागिरीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात,अशा विनंतीचे पत्र ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिले आहे.
ऑफ्रोह रत्नागिरीच्या उपाध्यक्ष नंदा राणे,कोषाध्यक्ष किशोर रोडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा पारशे,सुरेखा घावट,दादाजी बच्छाव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून ‘ऑफ्रोह’चा पाठिंबा जाहिर केला.
महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य ही संघटना कोरोना महामारीच्या काळापासून ते आजपर्यंत कार्यरत असणा-या महाराष्ट्रातील आरोग्य विभागात काम करण्याच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे. संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये पसरलेल्या असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आरोग्य विभागात काम करणारे जवळपास ४ हजार डाटा एन्ट्री
ऑपरेटर संघटनेशी जुळलेले आहेत.
तद्नंतर शासनाने मे. यशस्वी ॲकॅडमी फॉर स्कील, पुणे या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य विभागात शिकाऊ उमेदवार या नावाने डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरविण्याचे टेंडर दिले. कोविड काळानंतर आम्हाला मे यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल,पुणे या कंपनीतर्फे शिकाऊ उमेदवार म्हणून कामावर घेतले त्यावेळी कंपनीने असे कळविले होते की, अप्रेंटिसशिप ॲक्ट, १९६१ सुधारणा २५/०९/२०१९ नुसार आमची नियुक्ती ही तीन वर्षासाठी करण्यात आलेली आहे. परंतु आमचा कार्यकाळ हा केवळ दोन वर्ष पूर्ण झालेला आहे. तरीसुध्दा कंपनीने आम्हाला २०/११/२०२३ पासून कामावरून कमी करण्यात आल्याचे ईमेलद्वारे कळविले असून आमच्या जागेवर नव्याने डाटा एन्ट्री ऑपरेटर भरण्यात येईल, असे कळविले आहे.