मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास एकमुखी पाठिंबा

लांजा तालुका मराठा समाजाच्या सभेत घेण्यात आला एकमुखी निर्णय

लांजा (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्धार लांजा तालुका मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक आज रविवारी ५ नोव्हेंबर रोजी लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका मराठा समाजाची बैठक आज रविवारी लांजा येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकी प्रसंगी व्यासपीठावर लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, कार्याध्यक्ष सुनील कुरूप,उपाध्यक्ष शरद चव्हाण, महेश उर्फ मुन्ना खामकर, राहुल शिंदे तसेच सरचिटणीस विजय पाटोळे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव हे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर विविधा विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मराठा आरक्षण आणि जिल्हास्तरावर क्षत्रिय मराठा संघटना स्थापन करणे या संदर्भात उपाध्यक्ष शरद चव्हाण आणि विजय पाटोळे यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना यामध्ये सारथी योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ योजना, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबतचा मुद्दा पेटलेला आहे. त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत उपस्थितांकडून मते आजमावून घेण्यात आली. मात्र यावेळी दोन मतप्रवाह दिसून आल्याने शासनाच्या शोध मोहिमेतून जर का मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल आणि ज्यांना घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे .परंतु सरसकट मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी जिल्हा संघटनेच्या छत्राखाली लढा उभारणीत तालुक्याने सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यास शासनाला भाग पाडावे यासाठी शासनाकडे जिल्हा संघटनेने भूमिका मांडावी आणि वन्य विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेला लांजा तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.