भुईबावडा येथे शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपये बोनसचे वाटप
वैभववाडी | प्रतिनिधी
शेतीपूरक व्यवसायाकडे तरुणांनी वळले पाहिजे. दुग्ध व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पादन वाढू शकते. भुईबावडामधील युवा शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून प्रगती साधली आहे. या शेतकऱ्यांचा आदर्श इतर गावांतील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते भालचंद्र साठे यांनी केले.
भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ १ लाख लीटर इतके आहे. या डेअरीमध्ये एकूण ६५ शेतकरी दूध संकलन करतात. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला ४ रुपये इतका दर देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. यावर्षी एकूण ३ लाख ५५ हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये अरुण अमृत मोरे, सुरेश दत्ताराम मोरे, उज्वला उदय मोरे या तिघांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे.
यावेळी रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, रामदास नारकर, उज्वला मोरे, सानिका मोरे, भुईबावडा गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी मोरे, ऐनारी गावचे पोलिस पाटील श्रीकृष्ण विचारे, बाळा साईल आदी शेतकरी उपस्थित होते.