बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पुकारले होते डबे वाजवा आंदोलन
सावंतवाडी । प्रतिनिधी : बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत तब्बल ४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ वाहनांसह ३ कोटी २८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही कारवाईत सातत्य राखणार असल्याचे लेखी आश्वासन एक्साईज अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मनसेने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. गोवा बनावटीची दारू वाहतूक विरोधात मनसेने प्रशासनाविरोधात बुधवारी डबे वाजवा आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.
दरम्यान, इन्सुली तपासणी नाक्यावर असलेली कर्मचा-यांची कुमक कमी पडत आहे तरीही आम्ही सातार्डा तळवणे,आरोंदा,ओटवणे पोटवडीदा या ठिकाणी अधिकची नाकी उभारले असून बेकायदा दारूवर आमचे लक्ष आहे असेही आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य दारू वाहतूक विरोधात मनसे कडून आज येथील इन्सुलि तपासणी नाक्यावर डबे वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत आमच्या खात्याअंतर्गत कारवाई सुरू आहे त्यामुळे आंदोलन करू नका अशी विनवणी संबंधित पदाधिकाऱ्यांना केली त्यानंतर मनसेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असे मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकारातून म्हटले आहे.
Sindhudurg