डेरवणमधील एसव्हीजेसीटी शाळेच्या ८३ विद्यार्थ्यांना घडविण्यात आली हवाई युद्ध यंत्रांची सफर

खेड(प्रतिनिधी) माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित लोहगाव – पुणे येथील हवाई दलाला डेरवण येथील एस व्ही जे सी टी शाळेच्या इयत्ता ९ वी आणि १० वीच्या ८३ विद्यार्थी आणि शिक्षकांनी नुकतीच भेट दिली. कडक बंदोबस्तात सुरक्षिततेच्या नियमांनुसार खबरदारी घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना हवाई युद्ध यंत्रांची सफर घडविण्यात आली. मॅनपॅड्स मिसाईल, आकाश मिसाईल, रडार, मशीन गन्स, इ. कार्यरत युद्ध उपकरणे विद्यार्थ्यांना जवळून पाहता आली. तसेच काही शस्त्रे हाताळताही आली. लढाऊ विमान सुखोई ३० च्या प्रशिक्षित वैमानिकाने सुखोई ३० ची ठळक वैशिष्ट्ये प्रत्यक्ष विमानाभोवती विद्यार्थ्यांना नेऊन समजावून सांगितली.

जगातील सर्वात चपळ लढाऊ विमान सुखोई-३० च्या अत्यंत अनुभवी वैमानिकांनी एरोबॅटिक प्रात्यक्षिक करताना लूप, स्पिन, टंबल, स्टॉल, रोल, टच द स्काय, स्टॅन्ड स्टील यासारखे थरारक प्रदर्शन करून निखळ कौशल्य प्रकट केले आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. फ्लाइट- सिम्युलेशन स्टेशनमध्ये सुखोई-३० फ्लाइट- सिम्युलेशनने सर्वांना आभासी उड्डाणावर नेले. तसेच विशेष प्रशिक्षित सैन्यदल ‘गरुड’ ने आकाशातील हेलिकॉप्टर मधून दोरीच्या साहाय्याने एकामागोमाग एक जमिनीवर उतरून शिस्तबद्ध चाल करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

यावेळी विद्यार्थ्यांनी लढाऊ वैमानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि युद्ध यंत्रे आणि त्यांच्या प्रशिक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले. स्वतः माजी एअर चीफ मार्शल प्रदीपजी नाईक आणि एअर ऑफिसर कंमान्डींग शेखर यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

हवाई दलाच्या भेटीमुळे आपल्या राष्ट्रासाठी जोखीम पत्करण्यास तयार असलेल्या शूर योद्ध्यांकडून देशभक्ती, शिस्त, वक्तशीरपणा, समर्पण आणि जिद्द शिकायला मिळाली, तसेच या भेटीमुळे सशस्त्र दलातील संभाव्य करिअरचा विचार करण्यास प्रवृत्त झालो असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.