सालपे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांची मागणी
लांजा (प्रतिनिधी) स्मशानभूमी शेड बांधणे या कामाचा ठेका घेऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी काम सुरू न करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे आणि नवीन ठेकेदार नेमण्यात यावा, अशी मागणी सालपे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांनी केली आहे.
सालपे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांना दिलेल्या निवेदनात संकेत घाग यांनी म्हटले आहे की, सालपे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधील रोहिदासवाडी आणि घागवाडी येथील स्मशान शेड बांधणे या कामाचा ठेका चार महिन्यांपूर्वी विकास चव्हाण यांना देऊन टेंडर पास करण्यात आले होते. मात्र त्यांनी अद्यापही कामाला सुरुवात केलेली नाही. वारंवार याबाबत सांगूनही जनतेच्या आवश्यक असलेल्या कामाकडे ते जाणून-मधून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संकेत घाग यांनी केला आहे.चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही कॉन्ट्रॅक्टर विकास चव्हाण यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा कामाला सुरुवात केलेली नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
त्यामुळे ग्रामस्ताना वेठीस धरणाऱ्या अशा ठेकेदाराचे काम तात्काळ रद्द करून त्या जागी नवीन ठेकेदार नेमण्यात यावा आणि नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी संकेत घाग यांनी केली आहे. तसेच जनतेच्या हिताचे दृष्टीने काम मंजूर होऊनही काम न करणाऱ्या ठेकेराला काळ्या यादीत टाका अशी मागणी घाग यांनी केली आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदाराने तातडीने काम सुरू केले नाही तर त्याच्या आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा संकेत घाग यांनी दिला आहे.