वेंगुर्ले कृषी कार्यालयासमोरील आजचे शेतकऱ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
वेंगुर्ले: दाजी नाईक :पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन 2022-23 अंतर्गत अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या 4 दिवसात देय भरपाई न मिळाल्यास पुनश्च या कार्यालया समोर 10 नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन-2022-23 अंतर्गत विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर 45 दिवसांत देय भरपाई मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे तरी सदर मागण्या बाबत उचीत कार्यवाहीस विनंती आहे. याबाबत शेतकऱ्यांकडुन वारंवार पाठपुरावा सुरु होता. मात्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वेंगुर्ले तालुक्यातील शेतकरी संघाचे श्यामसुंदर राय, यशवंत सावंत, प्रदीप सावंत, संदीप नाईक, दिगंबर शेटकर, सुरेश नाईक, सुभाष परब, विजय सरमळकर आदी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला अजित पवार गटाचे एम के गावडे यांनी तसेच भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन माहिती घेतली. आपल्या मागण्या शासनामार्फत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या चार दिवसात नुकसान भरपाई मिळावी असे सांगून शेतकऱ्यांनी आजचे उपोषण स्थगित केले. मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने श्यामसुंदर राय यांनी दिला आहे.