टेलिमेडिसिन सिंधुदुर्गच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्करोग जनजागृती

मालवण | प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत ७ नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग दिन निमित्ताने कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली. याबाबत माहिती टेलीमेडिसीन प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक प्रतीक दुसेजा व सुमित सावंत यांनी दिली.

७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सर्व टेलीमेडिसीन सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रावर कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना रोगाची लक्षणे, रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच योग्य उपचार यांची माहिती देण्यात आली.

कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक योजना कार्यक्रम शासन राबवित असते. या कार्यक्रमाला देखील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा टेली मेडिसिन प्रकल्पाची सुरुवात करून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपचार करण्याची नाविन्यपूर्ण सुविधा या जिल्ह्यात निर्माण करून दिली. सध्या जिल्ह्यातील मोरगाव, बांदा,
रेडी, निरवडे, माणगाव, पणदुर, चौके,गोळवण, मसुरे, आचरा अशा दहा ठिकाणी ही सुविधा कार्यरत आहे. अशी माहिती प्रकल्पाचे उपसमन्वयक सुमित सावंत यांनी या पत्रकाद्वारे दिली.