Buldhana Hospital news : गर्भपिशवीला टाके घालण्याऐवजी महिलेला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या

महिलेचं मातृत्व हिरावणार्‍या जिल्हा प्रशासन रुग्णालयाचा ओंगळ कारभार

बुलढाणा : रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा भयानक प्रकार समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात घडली आहे. एक गर्भवती महिला (Pregnant Woman) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली असता तिला चुकून गर्भपाताच्या गोळ्या (Abortion pills) देण्यात आल्या. यामुळे त्या महिलेचे मातृत्व हिरावले गेले आहे. ही अत्यंत खळबळजनक घटना असून महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित महिला सौ. विद्या वाघ या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. आपल्या नेहमीच्या चेकअपसाठी त्या बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या गर्भपिशवीचे मुख काही प्रमाणात उघडे असल्याचे सांगितले. जर ते तसंच राहिलं तर बाळाला धोका निर्माण होऊन नैसर्गिक गर्भपात होऊ शकतो, त्यामुळे गर्भपिशवीला टाके घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. सल्ल्यानुसार त्या बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात गेल्या. मात्र, या ठिकाणी अचानक बाळाला धोका निर्माण होऊन ते दगावले.

या घटनेमुळे महिला व नातेवाईकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तिथे असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मात्र याबाबत डॉ.सुभाष चव्हाण यांनी माध्यमांना ही मोठी चूक असून या प्रकरणाची चौकशी करून प्रतिक्रिया देऊ असं सांगितलं आहे.