चिपळूण तालुक्यात ३७ हजार ४६५ शिधापत्रिकाधारक घेणार लाभ
चिपळूण (प्रतिनिधी) : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पुरवठा विभागाकडून आनंदाचा शिधा वाटपास सुरूवात झाली आहे. आनंदाचा शिधा संचातील वस्तू रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोच होण्यास सुरूवात झाल्याने कुटुंबांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या वाटपामुळे चिपळूण तालुक्यातील ३७ हजार ४६५ शिधापत्रिकाधारक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून दिवाळीसाठी प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संचामध्ये यावर्षी सहा वस्तू शंभर रूपयांत दिल्या जाणार आहेत. यामध्ये एक लीटर खाद्यतेल, एक किलो साखर तर रवा, पोहे, मैदा, चणाडाळ या वस्तू अर्धा किलो आहेत. शासनाने २५ ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांना हा संच देण्याची घोषणा केली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शिधा संच वाटप लांबणीवर पडले होते. मात्र आता या वाटपाला मुहुर्त मिळाला आहे. दोन दिवसांपासून रेशन दुकानांमार्फत वाटप सुरू झाले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मोठ्या टक्के वाटप करण्यावर भर दिला जाणार असून संबंधित रेशनदार दुकानदारांना चिपळूण तालुका विभागाकडून तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
या योजनेचा लाभ घेणारे तालुक्यात ३१ हजार ७७९ प्राधान्य शिधापत्रिकाधारक तर ५ हजार ६८६ अंत्योदय शिधापत्रिकाधारक असे एकूण ३७ हजार ४६५ शिधापत्रिकाधारक आहेत. १४८ रास्तदर धान्य दुकानातून त्यांना हा आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या आनंदाचा शिधा संच पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांचे फोटो आहेत. तालुक्यात टेरव, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका, तर काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत्या. या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्याने शिधा वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र त्यावर मार्ग काढत निवडणुका असणाऱ्या ग्रा.पं. हद्दीत सफेद पिशवीचा वापर करून हे संच वाटप केले जात आहेत. चिपळुणात ७९९ लाभार्थ्यांना या पिशवीतून वाटप होणार आहे.