शिवसेनेच्या राज्यव्यापी सोशल मीडिया “कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराला” सावंतवाडीतून सुरुवात

सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभरात पक्ष संघटन, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी तसेच विविध माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने राज्यभरात सक्रिय अभियान तसेच सोशल मीडियाचे जाळे पसरविण्यासाठी राज्यव्यापी कार्यकर्ता सोशल मीडिया मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येत आहे.

याचाच पहिला भाग म्हणून, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून कार्यकर्ता शिबिरांची सुरूवात करण्यात आली. सरकारच्या योजना आणि पक्षाची भूमिका पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत तसेच जनमानसात कथानक पोहोचविण्यासाठी एक साखळी आवश्यक असते. या कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाावर उपयोग करुन घेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चे बांधणी करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. पक्षाच्या राजकीय रणनीतीसाठी विशेष काम करणाऱ्या “शोटाईम” संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियाची एक विशेष टीम मुंबईहून सावंतवाडी येथे या शिबिरासाठी दाखल झाली होती.

यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिबिरात सक्रीय सहभाग घेतला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका जनसामान्यांत रुजविण्याचे आवाहन यावेळी नामदार दीपक केसरकर साहेबांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी जिल्हाप्रमुख श्री संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी माजी उपशहराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षा कुडाळकर आणि जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.