गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
मळगाव देऊळवाडी आयोजित शिबिरात लोकशिक्षण, आरोग्य व स्वच्छता विषयक प्रबोधन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या ४८ खेड्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बांदा पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. बी. बी. गायतोंडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संस्थेची स्थापना केली. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज विशाल असा वटवृक्ष झाला असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन राज्यात देशात व परदेशातही मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा हा वसा राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून जपला जात आहे. यापुढे देखील आपल्या समाजसेवेतून व चांगल्या वर्तनातून संस्थेची कीर्ती अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आदर्शवत काम करा, असे आवाहन बांदा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डी. बी. वारंग यांनी केले.
युवा प्रबोधन, लोकशिक्षण, आरोग्य, स्वच्छता या क्षेत्रात गेली २५ वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या बांदा पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मळगांव देऊळवाडी येथे आयोजित निवासी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मळगांव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. एस.पी. वेल्हाळ, कार्यक्रम सहा. अधिकारी डॉ.एम. एन. वालावलकर, प्राध्यापक शरद शिरोडकर, प्रा. दर्शना शिरोडकर, प्रा. हर्षवर्धिनी जाधव, माजी उपसरपंच अक्षया राऊळ,
माजी ग्रा.प. सदस्य गुरुनाथ गावकर, सामाजिक कार्यकर्ते सखाराम गावकर, पत्रकार सचिन रेडकर, सुखदेव राऊळ, ग्रामस्थ रघुनाथ राऊळ, उदय जामदार, सामाजिक कार्यकर्त्यां माधवी राऊळ, शामिनी राऊळ आदी उपस्थित होते.
मळगांव सरपंच स्नेहल जामदार यांनी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मळगांव ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देताना जर गावांचा विकास झाला तर साहजिकच देशाचा विकास होईल. आपण भारत देशाचे नागरीक आहोत ही जबाबदारी ओळखून सर्वांनी काम करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. त्यामूळेच सहभागी शिबिरार्थी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून आपले जीवन संस्कारक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
तर उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी विद्यार्थी – विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, तुम्ही पुढील आयुष्यात श्रम कसे करायचे, याचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिकून घ्या”असे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर यांनीही आपल्या मनोगत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर ठेवावा व आपल्या कार्याने स्वतःचे आपल्या गावाचे व पर्यायाने देशाचा नावलौकिक होईल असे काम करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शुभारंभी शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी “हम होंगे कामयाब” हे समूह गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी, मागील श्रम संस्कार शिबिरांचा आढावा घेतांना, तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच शिबिराचे महत्व विषद केले. तर प्रकल्प अधिकारी प्रा. एस. पी. वेल्हाळ यांनी, आपले महाविद्यालय मागील अनेक वर्षे, अशी शिबीरे यशस्वीरित्या राबवत असून यामागे विद्यार्थी- विद्यार्थिनींना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे विषद केले.
सदर शिबीर सोमवार दिनांक १६ जानेवारी ते रविवार दिनांक २२ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीत साबाजी जगन्नाथ राऊळ यांच्या घरासमोर व काळोजी घनःश्याम राऊळ यांच्या जागेत पार पडणार आहे. या पूर्वी अशी शिबीरे दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविली गेली आहेत.या शिबीरासाठी मळगांव ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले आहे. मळगांव मधील हे शिबीर २३ वे शिबीर असून त्यात विविध समाजोपयोगी प्रकल्प स्थानिक ग्रामस्थ, विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने राबविले जाणार आहेत तरी स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी शिबिराला भेट द्यावी, असे आवाहन प्रा. शरद शिरोडकर यांनी आभार प्रदर्शन करताना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एन. वालावलकर यांनी केले.
Sindhudurg