प्रहारच्या वर्धापन दिनी १५ व्यक्तिमत्वांचा होणार सन्मान

उद्या विशेष सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : ‘शब्दांना सत्याची धार’ या ध्येय्याने दै.प्रहारने सिंधुदुर्गात घेतलेल्या भरारीला १५ वर्षे होत आहेत. या निमित्त येत्या ९ नोव्हेंबरला वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा होत आहे. जिल्ह्यात अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी प्रतिकुल स्थितीतही न डगमगता आपली वेगळी वाट जपली आहे. अशांपैकी या सोहळ्यात समाजातील विविध घटकांत , विविध स्तरावर स्वत:च एक चळवळ बनत कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमात राणे प्रकाशन प्रा.लि.संचालक निलेश राणे, आ. नितेश राणे , प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, निवासी संपादक संतोष वायंगणकर उपस्थित राहणार आहेत. प्रहार भवन येथील विवेकानंद सभागृहात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होणार आहे.

या वर्षी प्रहार सन्मानचे मानकरी ठरलेत सावंतवाडी येथे कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश्वर तुकाराम दुर्भाटकर, कुडाळ येथील डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर,कणकवली येथील ज्येष्ठ वैद्यकिय तज्ञ डॉ.मधुसुदन दत्तात्रय देसाई,जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपूले या सानेगुरुजींची शिकवण घेऊन वाटचाल करणारे , संविता आश्रमातून सेवा देणारे संदिप प्रभाकर परब ,शैक्षणिक क्षेत्रात शिरगाव सारख्या ग्रामीण भागातील मुलांना जगभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचवितानाच , लोकल टू ग्लोबल याचा जिल्ह्यात पाया रोवून अनेक शिक्षकांना नवीन वाट दाखवितानाच मुलांना त्यांच्या कर्तृत्वाचे आभाळ मोकळे करणारे शिरगाव येथील मुख्याध्यापक शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना वयाचे बंधन नाही असे सांगतानाच एक आदर्श विद्यालय बनविण्याचा ध्यास घेतलेल्या सौ. सुलेखा रमेश राणे,आपला जन्म जनसेवेसाठीच आहे असा ध्यास घेतलेले दीपक रामचंद्र बेलवलकर, कोकणातील वारकरी संप्रदायाची पताका उंच फडकवतानाच संतांनी दिलेल्या मार्गदर्शनाने परमार्थातून परमेश्वराची शिकवण देण्यासाठी झटणारे वारकरी संप्रदायातील शिलेदार ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, रिक्षा चालवून सेवा देतानाच अनेक महिलांसमोर आदर्श ठरलेल्या तुळस येथील कु. हेमलता रविंद्र राऊळ ,सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व तारक कांबळी ,कोकणची परोपकारी वैद्यांची परंपरा सांभाळताना सामाजिकतेचा वारसा जपत कार्यरत असलेले कोनाळ येथील काशिनाथ कृष्णा शेटवे,सर्पमित्र राजन गंगाराम निब्रे,गरीब ,गरजूंचा दृष्टीदोष दुर करण्यासाठी धडपडणारे प्रवीण पेडणेकर, गावागावात रोजगार निर्मिती व्हावी म्हणून धडपडणारे विजय तावडे ,आणि मिरी लागवडीत नव्या संशोधनाचा अगदी सहज सोपा धडा देणारे कृषी तज्ञ राजन राणे यांचा सन्मान केला जाणार आहे.

आज प्रहारभवन मध्ये रंगणार स्वरश्रृंगार!

वर्धापन दिनाच्या औचित्यावर दिवाळीची पहिली संध्याकाळ वसुबारस दिवशी सायंकाळी ५ वा.सोनी टीव्ही इंडियन आयडॉल, झी मराठी सारेगमप फेम गायक कोकणकुमार गणेश मेस्त्री आणि मान्यता कुंटे यांची मैफिल रंगणार आहे. या मैफीलीत तबला – प्रसाद मेस्त्री,हार्मोनियम – अमित मेस्त्री,पखवाज – गौरव पिंगुळकर,साईड रिदम – योगेश मेस्त्री अन् निवेदक – नीलेश गुरव करणार आहेत. प्रहारच्या वाचकांबरोबरच संगीत रसिकांना ही मोठी पर्वणीच असणार आहे. या सोहळ्यात सर्वांनी अगत्याने उपस्थित रहावे,प्रहार कार्यालय येथील सत्यनारायण महापुजेचाही लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.