चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
वेंगुर्ले | दाजी नाईक : शासनातर्फे गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरविण्यात येते. दरम्यान आज बुधवारी सायंकाळी आडेली येथील धान्य दुकानात धान्य वितरणावेळी तांदूळच्या पोत्यामध्ये चायनिजसदृश्य पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत महसूल विभागाकडून त्वरित चौकशी होऊन संबंधित धान्य पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणी आडेली सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर यांनी केली आहे.
आज सायंकाळी ५ वा. च्या सुमारास आडेली येथील धान्य दुकानावर धान्य वितरण सुरु असताना तांदळाच्या पोत्यामध्ये प्लास्टिक पिशवीत लालसर रंगाचे चायनीज सदृश्य पदार्थ असल्याचे मापारी व सेल्समन यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सचिव मोरेश्वर कांबळी व सोसायटी चेअरमन प्रकाश गडेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रकाश गडेकर यांनी वेंगुर्ले पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर सायंकाळी उशिरा पुढील तपासाची कार्यवाही सुरु होती. तसेच या तांदूळ पोत्यामध्ये किडे व अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त करण्यात आली.
शासन आज गोरगरीब जनतेला तांदूळ, गहू आदी धान्य मोफत देते. परंतु आडेली येथे असा प्रकार आढळून आल्याने शासनाने गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळू नये, चांगल्या दर्जाचे धान्य वितरण करावे.तसेच या प्रकारची शासन स्तरावरून त्वरित चौकशी करण्यात यावी व अशा प्रकारचे धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य पुरवठादार याच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश गडेकर यांनी केली आहे.