सुप्रसिद्ध साहित्यिक अष्टपैलू व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली ’या पुस्तकात त्यांना रत्नागिरीत भेटलेल्या अंतुबर्वा याच्या चिकित्सक आणि तितक्याच बेरक्या स्वभावगुण वैशिष्ट्याचं व्यक्तिचित्रण आहे.कालच या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस होता.पु.ल.देशपांडे या अंतुबर्व्या विषयी मराठी साहित्यविश्वात प्रचंड अप्रुप आहे. कोकणातील माणसांचे स्वभावगुण वैशिष्ट्यच पु.ल.नी या अंतुमध्ये शोधले आहेत. कोकणी माणसाचा तिरकसपणा, कुणाला चांगल म्हणण्यासाठी फारच आढेवेढे घेण्याचा स्वभाव. असा एकूणच कोकणातील माणसांचा असलेला स्वभाव हा अंतुबर्व्याच्या रूपाने जरी पु.ल.ना रत्नागिरीत भेटला असला तरीही कोकणातील प्रत्येक गावात एकतरी अंतुबर्वा असावा असं वाटत. अंतुबर्वा या मानसिकतेततल गावो-गावी एकतरी माणूस कोकणातल्या गावातून भेटल्याशिवाय राहणार नाही. कोकणात कौतुकाने काही नव्याने करायला जावं किंवा काही नवीन सांगायला जावं तर निश्चितपणे त्याला छेद किंवा विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. कोकण ही बुद्धीवंताची खाण म्हणून ओळखली जाते. साहित्य, नाटक, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक अशा कोणत्याही क्षेत्रात कोकणातील कोणी अग्रभागी नाही असं होऊच शकत नाही. प्रचंड बुद्धीमत्ता आहे. परंतु संयमीपणा नाही. या तिरकसपणामुळे आपलं नुकसान होऊ शकत याची जाणीव कधी-कधी आपणालाच नसते. कोकणातील प्रकल्प, कोकणचा विकास आणि लोकभावना यातली नकारात्मकता यामुळे आजवर नुकसानच झाले आहे. प्रगतीच्या विकासाच्या आड येणारे हे स्वभावगुण आपण बदलले पाहिजे. एखाद्या मोठ्या विकास प्रकल्पाचा कसा विचका होऊ शकतो. त्यासाठी शिरोडा-वेळागर येथील ताजच्या पंचतारांकित प्रकल्पाचे उदाहरण नजरेसमोर घेता येईल. गेल्या पंचविस वर्षात शिरोडा-वेळागरचा विषय राजकिय इश्यू बनवला गेला. सोईनुसार ज्यांने-त्यांने या विषयाचे राजकारण केले. फक्त विद्यमान केंद्रियमंत्री ना. नारायण राणे यांनी शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल प्रकल्प व्हावा अशी भुमिका मांडली. सर्व्हेनंबर ३९ वगळावा किंवा कसे हा चर्चेचा संवादाचा विषय होता. परंतु जेव्हा कधी या प्रकल्पाला विरोध होत राहिला त्यामागेही कोणताही चर्चेचा विषय नव्हता. फक्त विरोध करणे एवढीच भुमिका घेण्यात आली होती. कधी विरोध तर कधी प्रकल्पाच्या बाजूने अशा सोयीच्या भुमिका अनेकांनी घेतल्या. विरोध करण्यासाठी माजी आ.कै.पुष्पसेन सावंत, माजी खासदार कर्नल सुधीर सावंत, समाजवादी कार्यकर्ते माजी सभापती जयप्रकाश चमणकर सर्वच प्रकल्पांना विरोध करणारे खा.विनायक राऊत आताचे विरोध करणारे माजी आमदार राजन तेली यासर्वांनी आताही विरोधी भुमिका घेतली आहे. जेव्हा-जेव्हा ज्यांना वाटत शिरोडा-वेळागर प्रकल्पातील सर्व्हेनंबर ३९ वगळला गेला पाहिजे असे वाटणाऱ्यांनी सत्तेच्याकाळात कधीच प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. गेली पंचविस-तीसवर्षे एखाद्या विषयाचे राजकारण फक्त केले जाऊ शकते. हे नको तर काय हवं हे सांगायच धाडस आणि तसे प्रयत्न कधीच कोणी केले नाहीत. अखंड कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिकडचा पालघर जिल्हा यासर्वांकडे पाहिले आणि कोण-कोणते प्रकल्प कोणा-कोणाच्या विरोधी भुमिकेने बासणात गुंडाळले गेले त्यावर जरी एक नजर टाकली तरीही प्रकल्पांना विरोध करणारे कोण आहेत. विरोध करण्यामागची कारण काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी एकच उत्तर मिळेल ते म्हणजे फक्त विरोधासाठी विरोध आणि राजकारण… माणसं तीच, चेहरे तेच, मुखवटेही तेच अशा या सर्वांमुळे कोकण विकासापासून दूर नसला तरीही मागे का ? या प्रश्नाच उत्तर आपसूकच मिळून जात. सकारात्मकतेने विचार करण्याची कुणाचीही मानसिकता नाही. राजकिय फायद्या-तोट्याची गणित मांडत होणाऱ्या विरोधाने काय नुकसान होत याच दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे चिपी विमानतळ गोवा राज्यातील आंतरराष्ट्रीय मनोहर विमानतळाची जेव्हा चर्चा नव्हती तेव्हा कोकणातील सिंधुदुर्गात चिपी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा या चिपी विमानतळ भूमीपूजन समारंभालाच काळे झेंडे घेऊन विरोध झाला. पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सद्हेतू ठेवून त्यासाठी आवश्यक असणारी जमिन संपादनाच्या विषयात पेन्सिल नोंदीच नसलेल भूत उभं केलं गेलं. या विरोधाच्याकाळात गोव्यातील मोपा येथे विमानतळाचे भुसंपादन होऊन मोपाला आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरूही झाला. कधीतरी राजकारणापलिकडे सर्व लोकप्रतिनिधी याचा विचार करणार की नाही ? प्रकल्पांना विरोध करून एखादी आमदारकी वातावरण बिघडवुन पदरात पाडून घेऊ शकते. त्यापलिकडे जाऊन विकासाच काय झालं ? काय होणार ? यावर जे विरोध करतात त्यात कुणाची तरी जबाबदारी घेऊन सांगतील काय ? कोणताही प्रकल्प किंवा विकासाचा चांगला विचार घेऊन काही चांगल उभं रहात असेल तर ते मोडून टाकण्यासाठी फार डोक लावाव लागत नाही. आपल्याकडे कोणतही मोडून टाकण्यासाठी अनेक डोकी कामाला लागतात. परंतु चांगल काही उभं रहाण्यासाठी आपणाला बदलाव लागेल. पु.लं. च्या व्यक्ति आणि वल्लीमधील तिरकस अंतुबर्वाचा आत्मा आजही गावा-गावात वावरतोय एवढ मात्र खरं…!