राज्य शासनाचा सुधारित निर्णय जाहीर
मालवण | प्रतिनिधी : राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांबरोबर शाळांमध्ये शासनाने अर्धवेळ ग्रंथपाल नेमणूक केले आहेत, दोन व तीन शाळा एकत्रित करुन शाळा मॅपिंग अहवालानुसार एक हजार एक विद्यार्थी संख्येमागे विद्यार्थी संख्येचा निकष पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदांवर अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांकर कर्मचारी संघटनने प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे
गेली दीड दोन वर्षें राज्यातील अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ व्हावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांकर कर्मचारी संघटनचे अध्यक्ष श्री सुरेश रोकडे (सातारा), राज्य समन्वयक संजय बनसोडे, खजिनदार प्रवीण धुमाळ (भिवंडी ), संघटक सतीश साठे सर (कोल्हापूर), चंद्रशेखर सावंत सर (सातारा) , संजय बनसोडे सर (बीड) यांनी अथक परिश्रम घेतले.
राज्यातील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणातील अटीनुसार अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय व अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी घेतलेला होता. आता या निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली असून, दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
दिनांक 13 एप्रिल 2023 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या पूर्णवेळ ग्रंथपाल पदांवर प्राधान्याने अर्धवेळ ग्रंथपालांपैकी 386 अर्धवेळ पूर्णवेळ ग्रंथपालांचे उन्नयन (रूपांतरण) करण्यात आले आहे.
अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्नयन झाल्यानंतर राज्यातील उपलब्ध असलेल्या 2118 पूर्णवेळ ग्रंथपालांच्या पदांच्या मर्यादेत दोन व तीन शाळा एकत्रित करुन शाळा मॅपिंग अहवालानुसार 1001 विद्यार्थी संख्येचा निकष पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या पदांवर सर्वप्रथम उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्नयन (रुपांतरीत करण्यास तसेच या कार्यवाहीनंतर शिल्लक राहिलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांचे टप्याटप्प्याने पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रुपांतरण) करण्यास पुढील अटींच्या अधिन राहून शासनाने मान्यता दिलेली आहे.
या अटींमध्ये अर्धवेळ ग्रंथपालांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पुर्णवेळ पदांवर उन्नयन (रुपांतरण) करणे.तसेच पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) होणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालाची अर्धवेळ ग्रंथपाल पदावरील सलग सेवा पूर्ण झालेली असावी. मंजूर अर्धवेळ ग्रंथपालाच्या पदावर अर्हताप्राप्त व्यक्तीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून नियमानुसार नियुक्ती झालेली असेल व अशा नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली असेल अशाच अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्नयन (रूपांतरण) करण्यात येईल, अर्धवेळ ग्रंथपाल पद हे आरक्षण धोरणानुसार भरलेले असावे, अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र ग्रंथपालांची समान वेतन टप्यावर वेतननिश्चिती करण्यात यावी व त्यांना 12 ऑगस्ट 96 च्या शासन निर्णयानुसार वेतन व फायदे देण्यात यावेत. तथापि, सदरहू ग्रंथपालांना 13 एप्रिल 2023 रोजीचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून वेतन व लाभ अनुज्ञेय राहतील. ही सुधारणा दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
त्यामुळे आता राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करण्यात आली असून, शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून या कर्मचाऱ्यांना वेतन व इतर लाभ मिळणार आहेत अशी माहिती संघटनेने दिलीं आहे.