रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आयोजित एकदिवशीय योग-दर्शन परिसंवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.या परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले. या वेळी महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व योगशिक्षिका सौ. रमा जोग, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका अॅड. रुची महाजनी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. पेन्ना यांनी या वेळी सांगितले की, संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला दिले आहे. गेल्या वर्षभरात या केंद्राने चांगली कामगिरी केली आहे. रामगिरी (रामटेक) ते रत्नागिरी या मार्गावर या केंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केंद्रासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. रत्नागिरी ही नवरत्नांची खाण आहे. त्यामुळे भविष्यात या केंद्रातर्फे अधिकाधिक योगदान दिले जाईल. आपला इतिहास, ज्ञान जगाला देण्यासाठी संशोधन करण्याशिवाय पर्याय नाही. धर्मविषयक काही शंका आल्यास महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे लिखित ग्रंथांचा संदर्भ घेतला जातो. यातील एका पुस्तकाचे भाषांतर मराठीतून झाले. रत्नागिरी ही नवरत्नांची खाण आहे. रत्नागिरी उपकेंद्रातर्फे संशोधन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्याकरिता तरुण अभ्यासकांची गरज आहे.
डॉ. मराठे यांनी या वेळी केंद्राचा एक वर्षांचा आढावा सादर केला. या वेळी शिल्पा पटवर्धन, रमाताई जोग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. काणे स्मृतीप्रबंध मराठी अनुवाद ग्रंथ आणि आंतरराष्ट्रीय परिषद वृत्तांताचा ७०० पानी ग्रंथ शोधरत्नमचे प्रकाशन डॉ. पेन्ना यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथाचे संपादन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे. मराठी अनुवाद काश्मिरा दळी व आशिष आठवले यांनी केला. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अॅड. महाजनी यांनी आभार मानले.