आंबा काजू विमा उतरवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत

शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.

वैभववाडी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांचे आवाहन

वैभववाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आंबा व काजू फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. तरी आंबा व काजू बागायतदार, शेतकरी यांनी त्वरित विमा उतरवून आपल्या फळबाग शेतीचे संरक्षण करावे असे आवाहन वैभववाडी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.आंबिया बहरामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कमी जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट, सापेक्षआद्रता या हवामान धोक्यापासून त्यांचे नुकसान झाल्यास विमा मिळू शकतो.
विमा नोंदणीसाठी पिकाची नोंद असलेला सातबारा, आठ अ, बँक पासबुक्स झेरॉक्स, आधार कार्ड आदी कागदपत्र आवश्यक आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकांसाठी चार हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.