माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या कलांगण परिवारातर्फे २१ रोजी ‘तुका आकाशा एवढा’ या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही मैफल २१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प,गोळवली येथे होणार आहे.सुप्रसिद्ध गायक कुणाल भिडे ही मैफिल रंगावणार आहेत. हे वर्ष संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ह.भ.प. तुकारामशास्त्री मिरजगावकर आणि प्रा.टी.के. जाधव यांनी वैष्णव वेद या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तुकोबांचा अप्रतिम परिचय करून दिला आहे. ते म्हणतात ,” लौकिक जीवनातील दुःखभार, पूर्वसंचिताची जोड, सुकृतांचा संचय, जन्मोजन्मांची पुण्याई, यांतून परमार्थाची आवड, ईश्वर-मीलनाचा ध्यास, त्या ध्यासाला आलेलं ईश्वरप्राप्तीचं फळ, त्यातून निर्माण झालेली अद्वैत अवस्था , अद्वैत अवस्थेतून स्वतःविषयीच्या विश्वात्मकतेची अनुभूती या सर्व बेरजेतून निर्माण झालेलं विश्वमंगलदायक , लोककल्याणकारी, मेणाहून मऊ व प्रसंगी वज्रासही भेदणारं विष्णुदासाचं व्यक्तिमत्त्व म्हणजेच तुकाराम महाराज होत.
तुकोबारायांचं काव्य म्हणजे एका सद्भक्ताची वाणी.महापुरुषाचंमनोगत.प्रतिभावंत कविप्रतिभेची गरुडझेप.एका संतसज्जन व्यक्तिमत्त्वाचा उपदेश.जातिद्वेष, वर्णभेद ओलांडून जाणाऱ्या महात्म्याचा संदेश.सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे वाटचाल करणाऱ्या महामानवाच्या विकसनशील व्यक्तिमत्त्वाचा उर्ध्वगामी आलेख आणि साधकाच्या विविध अवस्थांचे वर्णन आहे.”संत तुकाराम महाराज यांच्या अलौकिक कार्याला मानवंदना अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तुका आकशा एवढा या कार्यक्रमात तबल्याची साथ केदार लिंगायत,संवादिनी अमित ओक,पखवाज मंगेश चव्हाण,तर निरूपण धनंजय चितळे यांचे असणार आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कलांगण चे श्रीनिवास पेंडसे व निबंध कानिटकर यांनी केले आहे.