कणकवलीत नरकासुर नटतोय

उद्या विविध राजकीय व मंडळांकडून स्पर्धेचे आयोजन

नरकासुराची प्रतिमा तयार करण्यात गुंतली युवा पिढी

कणकवली ;
सोशल मीडियावर ऑनलाईन असणारी युवा पिढी आता ऑफलाईन होत नरकासुराची प्रतिमा तयार करण्यात गुंतली आहे. दिवाळीनिमित्त विविध राजकीय पक्ष व संघटनांनी नरकासुरांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून यात आपण तयार केलेली नरकासुर प्रतिमा अव्वल ठरावी याकरिता अक्राळ- विक्राळ रुपात नकारसुराच्या प्रतिमा तयार करण्यात कामात युवक गुंतल्याचे शहरात सर्वत्र चित्र आहे.

नरक चतुर्दशी अवघ्या काही तासांवर येवून ठेपली असून तालुक्यात ठिकठिकाणी युवक आता नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. नरकासुराच्या आक्राळ विक्राळ प्रतिमा उभारण्यासाठी तरुण वर्ग रात्री जागून काढत आहेत. मागील काही वर्षांपासून नरकासुराच्या प्रतिमा तयार करून मिरवणूक काढण्याचे प्रकार वाढले आहेत. पूर्वी गावागावांमध्ये नरकासुराचा प्रतिमा तयार केल्या जात होत्या. आता शहरी भागातही नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जात आहेत. त्यातच विविध राजकीय व मंडळांकडून नरकासूर स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. यात सहभागी होणारे स्पर्धक आता नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अलीकडच्या काही वर्षांत तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात नरकासुर स्पर्धेचे आयोजन गेले जात असून नरकासुराच्या आक्राळ प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. शहरात कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने तर शिवसेना पक्षातर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यासह अन्य ठिकाणी नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात स्पर्धेत महाकाय व आक्राळ विक्राळ नरकासुर प्रतिमा उतरविण्यासाठी युवक सज्ज झाले आहेत. त्याची अय्यद तयारी सर्वच मंडळाकडून सुरू आहे.