१ जाने २४ पासून मिळणार पुढील अनुदानाचा टप्पा
माखजन |वार्ताहर : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांचे ,शिक्षक समन्वय संघाच्या छताखाली सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन, मागण्या मान्य झाल्या मुळे स्थगित करण्यात आले आहे.३० ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या ह्या आंदोलनाला मोठे यश आले आहे.
ज्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा काहीच वेतन अनुदान घेत नाहीत,व ज्या पात्र ठरतील त्या संबंधित शाळांना १ जानेवारी २०२४ पासून २०%, ज्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये २०% अनुदान घेत आहेत त्यांना ४०% चा टप्पा,ज्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये ४०% वेतन अनुदान घेत आहेत त्यांना पुढचा ६०% चा टप्पा,व ज्या प्राथमिक,व माध्यमिक शाळा ६०% घेत आहेत त्यांना पुढचा ८०% चा टप्पा दिला जाईल अशी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानावर आंदोलनाला भेट देऊन घोषणा केली.यामुळे शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वेतन अनुदानाच्या प्रश्नी विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गतवर्षी पासून जातीने लक्ष्य घालून प्रश्न निकाली काढण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे राज्य भरातून आभार मानले जात आहेत.
२०११ व २०१४ च्या धोरणानुसार नैसर्गिक टप्पा वाढीच्या नियमाने १००% वेतन अनुदान द्या,या एकमात्र मागणीसाठी शिक्षकांच्या अनेक संघटना, शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून एकत्र येत हा लढा उभारला होता.या लढ्याला मोठे यश आले आहे.३० ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या आंदोलना ची शासन दखल घेत नसल्याचे चित्र समोर आल्यावर ८ नोव्हेंबर पासून शिक्षक समन्व्यक प्रा दीपक कुलकर्णी,ज्ञानेश चव्हाण,प्रा रवीकांत जोजारे यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली होती.एकूणच या रास्त मार्गाने व रास्त मागणी डोळ्यासमोर ठेऊन सुरु असलेल्या आंदोलनाची शासनाला दखलं घ्यावी लागली.
शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची,शासन दरबारी योग्य बाजू मांडण्याकामी व यशस्वी मध्यस्ती करण्यात मराठा कुणबी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड तुकाराम शिंदे यांचे मोलाचे योगदान लाभले.शिवाय मंत्री गिरीश महाजन,चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, आदिनी मोलाची साथ दिली.
विनाअनुदानित,अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकडे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गतवर्षी पासून काम करत असल्याने शिक्षकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षकांच्या मागण्यांकडे व या आंदोलनाकडे शिक्षक आमदारांनी ,पदवीधर आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले.शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना निवडून दिले आहे.त्यांनाच याची जाणीव नसल्याचे चित्र आझाद मैदानावर पाहायला मिळाले.राज्यातील शिक्षक आमदाराविषयी आझाद मैदानावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनाला विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,सदाभाऊ खोत,आदिनी भेट दिली.
१ जानेवारी २०२२पासुन वाढीव टप्प्यासाठी ११६० कोटी मंजूर करण्यात आले होते.यातील पावणे सहाशे कोटी रुपये खर्ची पडले आहेत.बाकीचा निधी विविध अडचणींमुळे वितरित होण्याचा राहिला आहे.हा निधी ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी खर्ची करून १ जानेवारी २०२४ पासून पुढील टप्पा देण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शासनाला तात्काळ प्रस्ताव द्यावा असे पत्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त पुणे यांना दिले आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक समन्वयक प्रा दीपक कुलकर्णी,प्रा संतोष वाघ,प्रा अनिल परदेशीं,प्रा कर्तारसिंग ठाकूर,ज्ञानेश चव्हाण,प्रा रविकांत जोजारे,प्रा रत्नाकर माळी, प्रा चंद्रकांत शिरगांवकर,प्रा भारत शिरगांवकर,प्रा गुलाबराव साळुंके आदिंसह् अनेकांनी मेहनत घेतली.या आंदोलनाला महाराष्ट्रातील हजारोनी शिक्षक सहभागी झाले होते.आंदोलनातील मागण्या मान्य झाल्याने शिक्षक समन्वय संघाने शासनाचे आभार मानले.












