उत्पादन शुल्क विभागासह पोलिस खाते मात्र झोपेचे सोंग घेऊन
राजापूर | प्रतिनिधी : ऐन दिवाळीत फटाके फुटत असतानाच राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे राजरोसपणे फटाके फुटत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. गोवा बनावटीच्या विदेशी दारूची शहरासह तालुक्यात खुलेआमपणे लगतच्या गोवा राज्यातून वाहतूक व विक्री होत असून या एकूणच प्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील या बनावटीच्या विदेशी दारूची राजरोजसपणे सुरू असलेल्या वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा की काय? असा सवाल केला जात आहे.
गत महिन्यात अशाच प्रकारे संरक्षण देऊन गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक रोखल्याप्रकरणी पोलीसांवर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पोलीसांनी काहींना अटक करून कारवाई केली होती. मात्र यातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्यापही पोहचलेले नाहीत. या प्रकरणाचे पुढे काय झाले याबद्दलही पोलीसांनी कोणतीच माहिती उघड केलेली नाही. तर याचवेळी नाटे येथे पोलीसांनी अशाच प्रकारे एका बारच्या व्हरांडयात गोवा बनाटीच्या विदेशी दारूचे उतरलेले सुमारे अडीच लाखाचे बॉक्स जप्त केले होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग असो व पोलीस प्रशासन असो त्यांच्या या कारवाया म्हणजे केवळ दिखाऊपणा असल्याचे बोलले जात आहे.
राजापूर तालुक्यातही खास करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक व विक्री होत आहे. गोवा व सिंधुदुर्गातून तालुक्यात रात्री-अपरात्री या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे कंटेनर, टेम्पो येत असून तालुक्यात अनेक ठिकाणी ही दारू उतरवली जात आहे. यामध्ये नाटे, जैतापूर, सागवे, केळवली रेल्वेस्टेशन परिसर, पाचल, तळवडे, सौंदळ अशा भागात या दारूची वाहतूक व विक्री होत आहेत. यातील काही जण तर गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे होलसेलचे विक्रेते असून ते लगतच्या भागातील छोट्या छोट्या गावात ही दारू पोहचवत आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागता अनेक ठिकाणी ही गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री होत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यामुळे कायद्याचा धाक वगैरे बाबी क्षुल्लक ठरल्या आहेत.
या गोवा बनाटीच्या विदेशी दारूची राजरोसपणे विक्री होत असल्याने व कमी पैशात ही दारू मिळत असल्याने तरूण पिढीही या व्यसनात ओढली जात असून अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात धडक कारवाई त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या राजरोसपणे सुरू असलेल्या विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करण्या झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनालाही जागे करावे अशी मागणी राजापूरवासियांतून होत आहे.