गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धत प्रत्येकी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक
रत्नागिरी l प्रतिनिधी :गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धत रत्नागिरीच्या पुर्वा आणि प्राप्ती किनरे या दोघी सख्खा भगिनींनी योगासन स्पर्धत प्रत्येकी दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके पटकावली. या महाराष्ट्र कन्यांचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी कौतुक केले. राज्याला या सुवर्णकन्यांचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
किनरे भगिनींनी पटकावलेल्या सहा पदकांमुळे महाराष्ट्र संघाला योगासनात सर्वसाधारण विजेता पद मिळविता आले. गोवा येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धचे उद्घाटन केले. या स्पर्धत योगासन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले होते. रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनरे या दोन्ही भगिनींनी आर्टिस्टिक पेअरमध्ये सुवर्ण, रिदमिक पेअरमध्ये रौप्य आणि आर्टिस्टिक ग्रुपमध्ये सुवर्ण अशी सहा पदके मिळविली. पूर्वा-प्राप्ती यांना योगासनांचे राज्य क्रीडा मार्गदर्शक योगशिक्षक रविभूषण कुमठेकर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडासंचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, सहसंचालक सुधीर मोरे,
उपसंचालक, नवनाथ फडतरे, संजय सबनीस, अनिल चोरमुले, माणिक पाटील, सुहास पाटील, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी तसेच महाराष्ट्र योगासन फेडरेशनचे अध्यक्ष संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, सतीश मोगावकर यांनी किनरे भगिनींचे अभिनंदन केले आहे.
पूर्वा-प्राप्तीची लक्षवेधी कामगिरी
पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तीन रौप्यपदक विजेत्या पूर्वाने आपली लहान बहीण प्राप्ती सोबत पदक पटकावले. आर्टिस्टिक पेअर मधील या दोघींची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वोत्तम कसरत आणि लवचिकता संतुलन या सर्वोत्तम कामगिरीतून त्यांनी पदकाचा बहुमान पटकावला. मोठ्या बहिणीला सर्वोत्तम साथ देत प्राप्तीनेही लक्षवेधी कसरती केल्या. किनरे भगिनींची चित्तथरारक योग कौशल्य पाहून यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी त्यांना भेटून त्यांचे कौतुक केले. किनरे भगिनींचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
इंजिनीयर पूर्वा-प्राप्तीची तपश्चर्या फळाला; युवांसाठी प्रेरणादायी प्रवास
रत्नागिरी जिल्ह्यातील पाली जवळच्या कशेळी या खेडेगावात खेड्यात राहणाऱ्या पूर्वा आणि प्राप्ती या दोघींनी योगासन प्रकारात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. रत्नागिरी येथील क्रीडा कार्यालयात असलेल्या राज्यातील पहिल्या योग क्रीडा केंद्रामध्ये राज्य योग क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गत बारा वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहेत. अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. आता 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची योगासनातील तपश्चर्या पदकाच्या माध्यमातून फळाला आली आहे. पूर्वाची योगासनातील सर्वोत्तम कामगिरी पाहून लहान बहीण प्राप्तीलाही प्रेरणा मिळाली. प्राथमिक शिक्षक असलेल्या आणि खो-खो चे पंच असलेल्या वडिलांनी या दोन्ही मुलींना मोठे पाठबळ दिले. त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पूर्वा आणि प्राप्ती यांनी अभ्यासाबरोबरच योगासनातील आपली साधना कायम ठेवली. प्राप्ती इंजिनीयर च्या चौथ्या वर्षाला शिकत आहे
शिवछत्रपती पुरस्कारासाठी योगाचाही समावेश व्हावा: पूर्वा
राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून योगासन या पारंपारिक खेळ प्रकाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे युवा खेळाडूंना या खेळ प्रकारासाठी प्रेरणा मिळेल. योगासनातील आमची बारा वर्षाची मेहनत पदकाच्या माध्यमातून आता यशस्वी ठरली आहे. युवा योगपटूंसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनातून देशांमध्ये योगासनाचा वेगाने प्रसार व प्रचार होईल. या क्रीडाप्रकारात शासनाने शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, म्हणजे या खेळाला आणखी चालना मिळेल, अशा शब्दात पूर्वा किनाऱ्याने पदक जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा: प्रशिक्षक कुमठेकर योगपटू पूर्वा आणि प्राप्ती यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला योगासनामध्ये मोठे यश संपादन करता आले. पदके जिंकून या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यांची राष्ट्रीय पातळीवरील ही कामगिरी निश्चितपणे अभिमानास्पद आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना पदकाच्या माध्यमातून मिळाले, अशा शब्दात प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी भावना व्यक्त केल्या.