चांगले नागरिक घडविण्यासाठी असे महोत्सव आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.आर. जोशी

रत्नागिरी  : मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व देशातील चांगले नागरिक घडविण्यासाठी यासारख्या बालमहोत्सवांचा फायदा होईल असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.आर. जोशी यांनी केले.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हयात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह मुलांमुलींमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. बाल महोत्सव १८ जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल.डी. बिले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी आर.एम. चौधरे, न्यायदंडाधिकारी तथा अध्यक्ष बाल न्याय मंडळ, रत्नागिरी माणिकराव सातव, अध्यक्ष बाल कल्याण समिती संदेश शहाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी. काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.डी. भोसले ,मातृमंदीर संस्थेचे हेगशेटये, बाल कल्याण समिती सदस्य शिरीष दामले, सदस्या विनया घाग, सदस्या लेवलेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात चाचा नेहरुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. तसेच याठिकाणी प्रमुख मान्यंवरांच्या हस्ते 100 मीटर धावणे, मुले क्रिडा आदि क्रिडा प्रकारांचे उद्घाटनही करण्यात आले.
माहेर संस्थेमधील बिसना थापा हिची राज्यस्तरीय कब्बडी मध्ये निवड झाल्याबद्दल तिचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल.डी. बिले म्हणाले याप्रकारे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा व क्षेत्र निवडण्यासाठी मुलांनी फायदा घ्यावा. महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष बाल कल्याण समिती संदेश शहाणे आपल्या मनोगतामध्ये अशाप्रकारच्या स्पर्धेतून व्यक्तीगत कलागुणांना वाव मिळते व सांघिक भावना निर्माण होते असे म्हणाले.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.बी.काटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हयात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह मुलांमुलींमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघीक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.