४७ एकरांवर साकारणार प्रकल्प स्थानिकांना मिळणार रोजगार
खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारित क्षेत्रातील असगणीच्या ४७ एकरच्या माळरानावर कोकाकोला प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळाला. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत मुख्यमंत्रांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोकणच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडताना शीतपेय बनवणाऱ्या कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सुमारे हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेय यांचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे त्या वेळी जाहीर करतानाच या प्रकल्पातून पाचशेहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. राज्यातील हा चौथा प्रकल्प असल्याने कोकाकोला प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा या औद्योगिक वसाहतीत येऊन पाहणी करत परिसरातील हवा, पाणी, मातीचे नमुने घेतले होते.
या प्रकल्पासाठी १०० एकर जागेची मागणी करण्यात आली असताना सध्या एमआयडीसीने ४७ एकरवर ताबा दिला आहे. लागणारी अधिकची जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे. सद्य:स्थितीत प्रकल्प जागेतून तेथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा असलेला प्रश्नही निकालात काढला गेला आहे.
गेल्या वर्षी प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात ८ फूट उंचीची आणि २ किमी लांबीची जांभ्या दगडाच्या भिंतीची उभारणी करण्यात आली. दरम्यान, प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याच्यादृष्टीने उद्योगमंत्री आणि पालकमंत्री हे तयारीला लागले आहेत. गेल्या दौऱ्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे.
२१ नोव्हेंबरला भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने या दौऱ्यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे; मात्र नोव्हेंबरअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत.