ICC Hall of fame मध्ये पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटपटूचा सन्मान

सोबत आणखी दोन क्रिकेटपटूंचा समावेश

नवी दिल्ली : आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ (ICC World Cup 2023) मधील साखळी फेरीतील सर्व सामने संपले असून १५ नोव्हेंबरला पहिली उपांत्य फेरी (Semi finale)भारत आणि न्यूझीलंड (India vs Newzealand) यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede stadium) होणार आहे. या सामन्याआधी आयसीसीने एक मोठी घोषणा केली. महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी (Diana Edulji) यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of fame) समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. याशिवाय भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डीसिल्वा (Arvinda De Silva) यांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन सन्मान केला आहे.

डायना एडुल्जी यांनी देशाचे १७ वर्ष प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी भारतासाठी २० कसोटी, ३४ वनडे सामन्यात अनुक्रमे ६३ आणि ४६ विकेट घेतल्या. १९९३च्या वर्ल्डकपनंतर डायना यांनी निवृत्ती घेतली होती. तर वीरेंद्र सेहवागने भारताकडून १०४ कसोटी, २५१ वनडे, १९ टी-२० सामन्यात मिळून १७ हजारहून अधिक धावा केल्या. कसोटीत २ वेळा त्रिशतक करणाऱ्या चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. अरविंदा डी सिल्वाने श्रीलंकेकडून ९३ कसोटी, ३०८ वनडे मॅच खेळल्या. २००३ च्या वर्ल्डकपनंतर अरविंदाने निवृत्ती घेतली होती. त्याच्या नावावर १५ हजार ६४५ आंतरराष्ट्रीय धावा आणि १३५ विकेट आहेत. या तिन्ही क्रिकेटपटूंच्या समावेशानंतर आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेल्या खेळाडूंची संख्या ११२ एवढी झाली आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्यापूर्वी ७ भारतीय क्रिकेटपटूंना हा सन्मान मिळाला होता. सर्वप्रथम २००९ मध्ये बिशन सिंह बेदी (Bishan Singh Bedi) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता. त्यानंतर २०१० मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांना हा सन्मान मिळाला होता. पुढे २०१५ मध्ये अनिल कुंबळेचा (Anil Kumbale) हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता, तर २०१८ मध्ये राहुल द्रविडलाही यात स्थान मिळाले. आयसीसीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) २०१९ मध्ये हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. तर विनू मांकड यांना २०२१ मध्ये या यादीत स्थान मिळाले होते.