चिपळुणात रिक्षा व्यावसायिकाकडून जादा भाडे आकारणी

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील एका रिक्षा व्यावसायिकाने जादा भाडे आकारणी केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी आरटीओंकडे केली आहे. प्रवासी वर्गाची लूट करणाऱ्या अशा रिक्षा व्यावसायिकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या निवेदनाव्दारे केली आहे.
यासंदर्भात विद्याधर साळुंखे यांनी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वा. चिपळूण स्थानकावरून चिपळूण पाग येथे जोशीआळी येथे जाण्यासाठी रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यू ६७९५) केली. त्यांनी तिथे जाण्यासाठी ७० रुपये भाडे सांगितले. या जास्त भाड्याबद्दल विचारणा केली असता सांगण्यात आले की, रात्रीचे दीड पट भाडे घेतले जाते. तसे पाहता चिपळूण शहरामध्ये असा नियम आहे असे कधी निदर्शनात आले नाही. दिवसा आम्ही प्रवास करतो त्या वेळेस ४० रुपये भाडे घेतले जाते. तरी सुद्धा दीड पट भाडे असेल तर ६० रुपये होतील, पण प्रवाशी लोक सकाळीच रिक्षा व्यावसायिकांशी भाड्यावरून वाद घालून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा गप गुमाने भाडे देवून आपला प्रवास करीत आहेत. मी सकाळी या भाडे बाबत येथील इतर रिक्षा व्यावसायिकांशी चौकशी केली असता असे समजले येथे चिपळूण शहरातील सर्व रिक्षास्टँडवर भाडे नक्की करण्यात आलेले नाही. प्रत्येक रिक्षा व्यावसायिक प्रवाशी बघून भाडे सांगतात. त्यामुळे अशा रिक्षा व्यावसायिकांची मुजोरी मोडीत काढून चिपळूण शहरातील प्रत्येक रिक्षा स्टँडवर भाडे आकारणीबाबत आणि तक्रार करण्यासाठी संपर्क नंबर देण्यासाठी फलक लावण्यास आदेश निर्गमित करावे. किंवा इतर शहराप्रमाणे मीटरची सक्ती करावी आणि संबधित दोषी रिक्षा व्यावसायिकावर नियमानुसार कारवाई करावी, असेही श्री. साळुंखे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
चौकट-
जादा भाडे आकारणे चुकीचेच
प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे चुकीचेच आहे. अशा रिक्षा व्यावसायिकांना संघटना पाठीशी घालणार नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी खातरजमा करून अशा रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करावी. कारण एका व्यक्तीच्या चुकीचे परिणाम नियमांत व्यवसाय करणाऱ्यांना भोगायला नको.
दिलीप खेतले,
अध्यक्ष, चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा