नाटक कंपनी चिपळूणच्या अध्यक्षपदी श्रवण चव्हाण

सचिवपदी रसिका जोशी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणसह जिल्ह्याच्या सामाजिक, नाट्यचळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या नाटक कंपनी चिपळूणची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी श्रवण वैभव चव्हाण यांची तर सचिवपदी रसिका प्रमोद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष योगेश बांडागळे, खजिनदार सावरी शिंदे, सदस्य ओंकार भोजने, प्रद्युम्न देवधर, सागर भोजने, तुषार जाधव, सल्लागार राऊ चिंगळे, आदेश कांबळी यांचा समावेश आहे. नाटक कंपनी चिपळूण ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शहरातील नाट्य चळवळ सुरु रहावी, यासाठी संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत. गेली अनेक वर्षे स्थानिक कलाकारांना संधी मिळावी, यासाठी हाऊसफुल्ल या उपक्रमाखाली जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट येथे एकांकिका व अन्य कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी दिली गेली. कोकणचा साज संगमेश्वरी बाज, या लोकनाट्याचा प्रयोग याच ठिकाणी आयोजित करुन कोकणची लोककला जपण्याचा प्रयत्नही संस्थेने केला आहे. कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणारे कोरोना योध्दे सन्मान व्हावा, यासाठी पवन तलाव मैदान या ठिकाणी भव्य कोविड क्रिकेट लीग ही स्पर्धा घेण्यात आली.
जुलै २०२१च्या महापुरानंतर काही भक्तांना गणेश मूर्ती विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या. हास्य तराना, बाल बाल देखो हे बालनाट्य, असे कितीतरी उपक्रम संस्थेने राबविले आहेत. नाट्यरंग अंतर्गत संगीत मल्लिका व चित्रकथी अशी दोन नाटकंही रसिकांना नुकतीच विनामूल्य दाखविण्यात आली. संस्थेची नोंदणी नाट्य संस्था चिपळूण अशी असली, भविष्यातील उपक्रम हे नाटक कंपनी चिपळूण या बॅनरखालीच होणार आहेत, असे यावेळी अध्यक्ष श्रवण चव्हाण यांनी सांगितले.