कोकणातली पोरं महाराष्ट्रात घालताहेत ‘बारस’

 चिपळुणातील सांस्कृतिक केंद्रात उद्या नाट्यप्रयोग

चिपळूण (प्रतिनिधी) : सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक म्हणजे ‘बारस’. कोकणातील मुलांनी मुंबईत येऊन जॉब करीत नाटकासोबत असलेली नाळ तुटू नये, म्हणून कलांश थिएटरची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गत अनेक शॉर्टफिल्म, यूट्यूब व्हिडिओ, एकांकिका सादर झाल्या, त्यातीलच महाराष्ट्रभर गाजलेली एकांकिका म्हणजे बारस. शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी बारस या नाटकाचा चिपळूणमध्ये प्रयोग होत आहे.
बारस ही कोकणातील एक प्रथा असून यावर नाटकरुपी काहीतरी होऊ शकतं, ही मूळ संकल्पना महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांना सुचली व प्रथम या संकल्पनेवर यूथ फेस्टिव्हलमध्ये एक प्रहसन सादर झालं, जे नॅशनल लेव्हलला पहिलं आलं. याचं लिखाण केलं होत श्रमेश बेटकर याने व नंतर याच संकल्पनेवर आधारित प्रतिक चौधरी व अनिकेत शिगवण यांनी एकांकिका लिहिली व अभिजित मोहिते याने दिग्दर्शन केले. ही एकांकिका अनेक स्पर्धामध्ये नंबरात आली व परीक्षक व प्रेक्षकांकडून याच दोन अंकी नाटक व्हावं अस वारंवार सांगण्यात आलं आणि २२ एप्रिल २०२३ रोजी बारस या दोन अंकी प्रायोगिक नाटकाचा पहिला प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर, दादर येथे पार पडला. माणूस मेल्यावर त्याच्या बाराव्याला कोकणात बारस घातली जाते. कलांश थिएटरने एक नाट्य रचून त्यात बारस ही प्रथा सादर केली आहे. ही प्रथा नक्की काय आहे हे पाहायचं असेल, तर हे नाटक आवर्जून पहा. या नाटकाचे आत्तापर्यंत दादर, पनवेल, पुणे, बोरिवली, ठाणे या ठिकाणी ७ प्रयोग झाले आहेत. अनेक प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप या कलाकारांवर पडत आहे. प्रायोगिक असलं, तरी व्यवसायिक दर्जाचं हे नाटक आहे, असच सर्व प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आई-वडील वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना खुर्चीत बांधून दाखवावं, असं हे नाटक आहे. या नाटकाचा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संध्याकाळी ६, शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी भवानी सभागृह पालपेणे रोड, शृंगारतळी येथे रात्री ९ वाजता, रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पित्रे कलामंच, शिवाजी चौक, देवरुख येथे संध्याकाळी ७.३० वाजता प्रयोग होणार आहेत.
चौकट-
मूळ संकल्पना- महेश कापरेकर- सागर चव्हाण, लेखक प्रतिक चौधरी, अनिकेत शिगवण, दिग्दर्शन अभिजित मोहिते, संगीत श्रीनाथ म्हात्रे, प्रकाश योजना समीर सावंत, रंगभूषा तेजश्री पिलणकर, वेशभूषा- महेश- सागर, विशेष आभार निलेश सावे, सुनिल पाटील.