अनिरुद्ध कोळवणकर जपत आहे शिवरायांचा इतिहास
चिपळूण (वार्ताहर) : त्याच दऱ्या खोऱ्या…त्याच तोफा आणि तशीच वस्ती…मावळे हत्ती घोडे आणि डौलाने फडकणारा शिवरायांचा भगवा !.. तोरणा किल्यावर असलेले हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे ऐतिहासिक वैभव अगदी हुबेहूब चिपळूणमध्ये अनिरुद्ध कोळवणकर या बालविद्यार्थाने लक्षवेधी किल्ला साकारले आहे. गड किल्ल्यातून मागील तीन वर्ष अनिरुद्ध कोळवणकर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपत आहे. या चिमुकल्याने साकारलेला तोरणा पाहण्यासाठी येथील मंडळी येत असून प्रत्येकजण किल्याबद्दल अनिरुद्धचे कौतुक करीत आहेत.
परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेला अकरा वर्षीय बालविद्यार्थी कृ. अनिरुद्ध अनिकेत कोळवणकर या छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम असणाऱ्या चिमुकल्यांने चिपळूण शहरातील वाणीआळी येथील मुरलीधर मंदिर बाजूला आपल्या निवासस्थानी प्रशस्त अशा जागेमध्ये तोरणा किल्ला साकारला आहे. या बालकाने मागील आठ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाने युट्यूबला व्हिडिओ पाहून साक्षात खऱ्या-खुऱ्या तोरणा किल्ल्याला आकार दिला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी चिपळूण शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील बाल विद्यार्थी व नागरिक येत आहेत. तेथे शिवरायांच्या आकाशकंदीलसह खास विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. माती, दगड, भुसा, शेण, चुना, कलर, काव, बारदान, प्लास्टिकची भांडी याचा वापर करून अनिरुद्ध यांने ऐतिहासिक सौदर्य लाभलेला तोरणा किल्ला बनवला आहे. दिवाळी आणि किल्ला हे समीकरण होऊन गेले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे दिव्य स्मरण आपल्याला होते.
यावेळेस तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारून अनिरुद्धने शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. त्याने तोरणा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. त्याला कुटुंबातील सर्वांनी उत्साह दाखवत किल्ला प्रतिकृती साकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. यंदा तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचं ठरवून त्याने तटबंदी,बुरुज,घर, तोफखाना, मंदिर, बैलगाडी, घोडागाडी, झोपड्या, विहीर हे त्यांनी स्वतःच्या हाताने निर्माण केले. दगड, माती आणण्यापासून सर्व गोष्टी त्यांने आवडीने केल्या. किल्ला बांधल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जणू एखादा गड जिंकल्यासारखा होता. अनिरुद्ध हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा निसिम भक्त असून त्याचे शिवरायांवर प्रचंड प्रेम आहे. आपल्या बालमित्रांना व कुटुंबातील व्यक्तींना तो आपल्या बोलण्या चालण्यातून नेहमी शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदरपूर्वक विचार मांडून आपल्या थोडक्या शब्दात शिवरायांचा वारसा व विचार पुढे नेण्यासाठी प्रबोधन करीत असतो. मागील तीन वर्ष विविध ठिकाणचे किल्ले अनिरुद्ध बनवीत असून त्याला या कामी आजोबा दीपक नारायण कोळवणकर, आजी दीपा दीपक कोळवणकर, वडील अनिकेत दीपक कोळवणकर, आई सौ.अमृता अनिकेत कोळवणकर, अनीका अनिकेत कोळवंणकर प्रोत्साहन देत असून या कामी त्याला लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य ते नेहमी करीत असतात. या चिमुकल्याने साकारलेल्या तोरणा किल्ला चिपळूण शहराचे खास आकर्षण ठरत आहे. आजच्या उत्साहाने चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी चिमुकले छत्रपती शिवाजी महाराजांचा ऎंतिहासिक वारसा जपताना दिसत आहेत. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतला होता. तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड आहे. पुणेपासून तोरणा किल्ल्याचे अंतर ६० किलोमीटर आहे. तोरणा किल्ल्यावरुन रायगड किल्ला, लिंगाणा, राजगड किल्ला, पुरंदर किल्ला, सिंहगड किल्ला हे सर्व गड दिसतात. किल्ले स्पर्धेत या आधी अनिरुद्ध यांने आपला सहभाग नोंदवला होता. मागील वर्षी त्याने साकारलेल्या रायगड किल्ल्याला तिसरा क्रमांक मिळाला होता. यावर्षी राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट, एस .पी .एम स्कूल परशुराम यांच्या किल्ले स्पर्धेमध्ये अनिरुद्ध याने तोरणा किल्ल्याचा सहभाग नोंदविला आहे. मुलांनी बालवयापासून शिवरायांचे विचार जोपासले पाहिजेत. आपल्या मित्र मंडळींमध्ये संस्कृती पुढे नेण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. मुलांनी प्रत्येक वर्षी किल्ला बनविणे गरजेचे आहे. किल्ला बनवताना शक्यतो जुने मावळे मूर्ती किंवा खराब झालेले साहित्य पुन्हा वापरू नका असे सांगून बालकलाकार अनिरुद्ध कोळवणकर याने चिपळूण वासियानी किल्ला अवश्य पाहण्यास यावा, असे आवाहन केले आहे.