तारकर्ली समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवले

 समुद्रात सलग दोन दिवस पर्यटक बुडण्याच्या घटना

मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविण्यात आल्याची घटना बुधवारी घडली असतानाच गुरुवारी सायंकाळी पुन्हा तारकर्ली एमटिडीसी केंद्रासमोर समुद्रात बुडणाऱ्या पुणे येथील पर्यटकाला वाचविण्यात आले आहे.

पुणे येथील कॉलेजच्या मुलांचा ग्रुप तारकर्ली येथे पर्यटनास आला होता. समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना यातील अजय नवले हा युवक पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यास गेलेला प्रीतम गणेश बोरकर (वय २२, रा. मार्केट यार्ड पुणे) हा समुद्रात बुडूत असताना त्याच्या मित्रांनी व स्थानिकांनी त्याला वाचविले. तर बुडणारा अजय नवले हा स्वतःहून पाण्याबाहेर आल्याने वाचला. अत्यवस्थ बनलेल्या प्रीतम याला मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले.

ग्रामस्थांकडून पर्यटकांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देऊनही पर्यटक ऐकत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी देखील चिंता व्यक्त करत समुद्रात जाण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.