राष्ट्रीय मधुमेह दिवस निमित्ताने जनजागृती
टेलिमेडिसिन सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : टेलिमेडिसिन सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय मधुमेह दिवस जनजागृती करून साजरा करण्यात आला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर न्युरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” या टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत राष्ट्रीय मधुमेह दिवस निमित्ताने मधुमेह आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. याबाबत माहिती जिल्ह्याचे टेलीमेडिसीन प्रकल्पाचे समन्वयक प्रतीक दुसेजा व सुमित सावंत यांनी दिली.
१४ नोव्हेंबर हा राष्ट्रीय मधुमेह दिवस म्हणून जगात साजरा केला जातो. या निमित्ताने सर्व टेलीमेडिसीन सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रावर मधुमेह आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांना या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच आहारात काय घ्यावे यांची माहिती या सर्व केंद्रावर देण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून राष्ट्रीय मधुमेह दिवस यशस्वी केला.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा टेली मेडिसिन प्रकल्पाची सुरुवात करून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपचार करण्याची नाविन्यपूर्ण सुविधा या जिल्ह्यात निर्माण करून दिली. सध्या जिल्ह्यातील मोरगाव, बांदा,
रेडी, निरवडे, माणगाव, पणदुर, चौके, गोळवण, मसुरे, आचरा अशा दहा ठिकाणी ही सुविधा कार्यरत आहे. अशी माहिती प्रकल्पाचे उपसमन्वयक सुमित सावंत यांनी या पत्रकाद्वारे दिली.
फोटो : टेलिमेडिसिन सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय मधुमेह दिवस जनजागृती करून साजरा करण्यात आला. (अमित खोत, मालवण)