युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोहसह महिलांची चिपळूण न.प.वर धडक

चिपळूण शहर परिसरात मचूळ, खारट पाणीपुरवठा

चिपळूण (प्रतिनिधी) : वारंवार तक्रार करूनही अधिकारी, कर्मचारी दखल घेत नाहीत. हे दूषित पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का, असा सवाल करीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोहसह पदाधिकारी व महिलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मचूळ व खारट पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला. काही दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही यावेळी प्रशासनाला दिला.

गेले कित्येक दिवस चिपळूण शहर परिसरात नगर पालिकेकडून मचूळ व खारट पाणी पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक नागरिक व महिलांनी गुरूवारी सायंकाळी नगर पालिकेवर धडक दिली. विशेष म्हणजे ताशा वाजवत पदाधिकारी नगर पालिका कार्यालयात शिरले. यानंतर नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांची भेट घेत दूषित पाणी पुरवठ्याबाबत चर्चा केली. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजिद सरगुरोह, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्या श्रध्दा कदम, माजी नगरसेविक सफा गोठे, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष ऋषिकेश शिंदे, रऊफ काझी, मंजुर सुर्वे, काँग्रेस कार्यकर्ते नईम खाटीक यांच्यासह नागरिक व महिला, तसेच आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर व अधिकारी उपस्थित होते. यानंतर आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण शहरामध्ये नगर पालिकेमार्फत सोडण्यात येणारे पाणी नागरिकांना वेळेवर सोडले जात नाही. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून तो अपुरा पडत आहे. हे पाणी खारे आणि दूषित येते. या संदर्भात वारंवार तक्रारी येत असून त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वारंवार नगर पालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांशी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन कल्पना दिली जात आहे. परंतु एवढे करूनसुद्धा कोणताही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना या दूषित पाण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे. शुद्ध पाणी ही नागरिकांची मुलभूत गरज आहे. हे शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असे साजिद सरगुरोह यांनी सांगितले. तरी आपणाकडून याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. यामध्ये बदल न झाल्यास युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.