पाटपन्हाळे महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी जनजागृती विषयावर चर्चासत्र संपन्न

Google search engine
Google search engine

गुहागर  | प्रतिनिधी : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पी. ए. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि फील केयर अँड सोल्युशन, मुंबई या संस्थेचे मालक मदन म्हापनकर तसेच संस्थेच्या प्रतिनिधी सौ वृषाली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील महिला विकास मंचाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी जनजागृती विषयावर एकदिवसीय चर्चासत्र संपन्न झाले.

हा कार्यक्रम महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महिला विकास कक्षाच्या समन्वयिका प्रा. सौम्या चौघुले यांनी महाविद्यालयातील महिला कर्मचारी तसेच विद्यार्थिनींना चर्चासत्राविषयी थोडक्यात माहिती दिली तसेच महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे व नाजूक प्रश्नावरती चर्चा करण्याचे आवाहन केले.

या चर्चासत्रात मासिक पाळी घ्यावयाची काळजी व धोके, गर्भाशयाचा कर्करोग, पीसीओडी, अंडाशयातील आजार व त्यामुळे गर्भधारणेस येणाऱ्या अडचणींचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण व त्याच्यावरती प्रबोधन या विषयावर चर्चा करण्यात आली, फील केयर अँड सोल्युशन, मुंबई या संस्थेचे मदन म्हापनकर तसेच सौ वृषाली ठाकरे यांनी बाजारपेठेत उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड व फील कैयर अँड सोल्युशन्स निर्मित सॅनिटरी पॅड यांच्यातील फरक प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमार्फत विद्यार्थिनींना लक्षात आणून दिला. तसेच, सॅनिटरी पॅड हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे एक गंभीर कारण कसे होऊ शकते या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. महिला व मुली यांच्या मासिक पाळीतील समस्या पूर्णपणे बंद व्हाव्यात व महिलांची भावी पिढी निरोगी मासिक पाळी अनुभवून कॅन्सर मुक्त व्हावी या उद्देशाने महाविद्यालयीन व्यासपीठावर अशा आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या चर्चासत्रांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मदन म्हापनकर यांनी केले.

प्राचार्य प्रमोद देसाई यानी फील केयर अँड सोल्युशन, मुंबई या संस्थेचे मालक मदन म्हापनकर तसेच सौ वृषाली ठाकरे यांनी महाविद्यालयात येऊन विद्यार्थिनीना प्रत्यक्ष मार्गदर्शन केल्याबद्दल ऋण व्यक्त केले. मासिक पाळी हा व्यक्तिशः महिलांचा खाजगी आरोग्यविषयक प्रश्न असला तरी प्रत्येकाने त्याच्यावर उघडपणे बोलण्याची व पूर्णतः विषयच गांभीर्याने हाताळण्याची वेळ आली आहे असे सुतोवाच केले. त्यांनी महाविद्यालयीन महिला विकास कक्ष अधिकाधिक विद्यार्थिनीभिमुख उपक्रम आयोजित करीत असल्याचे सांगून समन्वयिका, प्रा. सौम्या चौघुले व त्यांच्या पूर्ण कमिटीचे कौतुक केले कार्यक्रमाला फील केयर अँड सोल्युशन, मुंबई या संस्थेचे मालक, मदन म्हापनकर, सौ वृषाली ठाकरे, महाविद्यालयीन आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. एल. एम. गजभिये, प्रा चैत्राली झिंबर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. देसाई व विद्यार्थिनी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयिका प्रा. सौम्या चौघुले यांनी तर आभार सोनिया पावसकर हिने मानले.