ई-पीक पाहणी अॕप द्वारे आपल्या शेतातील पिकाची घाला नोंद

नेमळे येथील गाव भेट कार्यक्रमात तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

शेतकरी खातेदाराने शासन आदेशानुसार ई-पीक पाहणी अॕप द्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः शेतात जाऊन करावयाची आहे. तसे न केल्यास प्रत्येकाच्या सात बारा मधील पिक पेरा कोरा राहील. त्यामुळे कोणतीही शासकीय मदत नुकसानभरपाई ,पिक विमा ,पिक कर्ज ,अनुदान शेतकऱ्यांला मिळणार नाही. याची प्रत्येक शेतकऱ्याने दखल घेऊन ई-पिक पेरा स्वतः च्या ॲंड्राईड मोबाईलवर किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरुन करुन सातबारावर लागवडीची नोंद घालून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार श्रीधर पाटील यांनी केले. नेमळे येथील गावभेट कार्यक्रमात प्रत्यक्ष भातशेताच्या बांधावर तहसीलदार यांनी बैठक उपस्थित शेतकऱ्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी नेमळे गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

यावेळी नेमळे तलाठी अरुण पाटोळे,ग्रामसेवक विनोदसिंग चौहान, ग्रामपंचायत सदस्य सुहास पिकुळकर ,मंडळ अधिकारी व्ही.एस.कोदे, मळगाव तलाठी सचिन गोरे,पोलिस पाटील रमेश नेमळेकर,तंटामुक्ती अध्यक्ष सखाराम राऊळ ,देवस्थान कमिटी अध्यक्ष आ.भि.राऊळ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sindhudurg