भरणेतील पथदीपांचा दिवसा ‘उजेड’

वीज बचतीच्या मूलमंत्राकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

खेड (प्रतिनिधी) महावितरणकडून ग्राहकांना वीज बचतीचा मूलमंत्र दिला जात असला तरी बहुतांश ग्रामपंचायतींकडून या संदेशाकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भरणे ग्रामपंचायतीच्या पथदीपांचा दिवसाढवळ्याही उजेड सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अण्णाच्या पऱ्यापासून पुढील भागात पथदीप उभारण्यात आले आहेत. याशिवाय अन्य प्रभागांमध्येही देखील पथदीपांमार्फत सायंकाळपासून पहाटेपर्यंत ‘प्रकाश’ दिला जात आहे. मात्र उजाडल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप बंद करण्याची तसदी संबंधित ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून घेतली जात नसल्याने दिवसाढवळ्याही पथदीपांचा उजेड सुरू आहे. दिवसाढवळ्याही सुरू असलेले पथदीप पाहून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. दिवसाही सुरू असणाऱ्या पथदीपांमुळे ग्रामपंचायतीला आर्थिक भार देखील सहन करावा लागत असून हा भुर्दंड कशासाठी? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.