सावंतवाडी जिमखानावर उद्या रंगणार पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचा ‘महासंग्राम’

Google search engine
Google search engine

बक्षिसांची खैरात : आठ संघांचा सहभाग

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम उद्या २० जानेवारी रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानावर रंगणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एडमिशन कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन तर सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.राजकीय रणांगणात रंगणारे सामने असोत वा क्रिकेटसह अन्य खेळांच्या मैदानावर रंगणारे सामने असोत पत्रकार नेहमीच या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करत असतात. याच त्यांच्या धावपळीच्या जीवनात चार क्षण विरंगुळ्याचे जावे यासाठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने पुढाकार घेतला असून शुक्रवार २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात जिल्ह्यातील आठ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ११ हजार व कायमस्वरूपी चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ७ हजार व कायमस्वरूपी चषक तसेच मालिकावीर, अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी रोख पारितोषिकासह आकर्षक चषक तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक अशी बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. स्पर्धेच्या वेळीही ‘ऑन द स्पॉट ‘ अनेक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्रांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिवप्रसन्न राणे , खजिनदार रामचंद्र कुडाळकर व क्रिकेट स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्षसचिन रेडकर यांनी केले आहे.