चिपळूण (प्रतिनिधी) : कै. शेवंती राजाराम आंब्रे सामाजिक प्रतिष्ठान, पाग चिपळूण या संस्थेमार्फत याही वर्षी दीपावली सणाचे औचित्य साधत श्रमिक सहयोग संचलित प्रयोगभूमी, कोळकेवाडी येथील वंचित समाजातील विद्यार्थ्यांना फटाके, सुगंधी साबण, उटणे यांचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत आंब्रे कुटुंबीय व मित्रपरिवाराने दिवाळीचा आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे तीन दिवस पुरेल, इतक्या फरळाचे वाटप करण्यात आले. तसेच कोळकेवाडी येथील धनगर, कातकरी वाडीवस्तीवर जाऊन तेथील बांधवाना दिवाळी फराळ व गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आंब्रे कुटुंबियांतील ज्येष्ठ व रंगकर्मी दिलीप तथा अण्णा आंब्रे, अॅड. तृप्ती आंब्रे, सुभाष आंब्रे, आदित्य आंब्रे, श्रेयश आंब्रे, श्रवण जांभळे, मंथन सकपाळ, मित्र परिवारामध्ये नैनेश तांबडे, विनायक सावंत, महेश चिले, रोहित नरळकर, महावितरणचे पप्पू घोरपडे, दीपक लटके आदी सहभागी झाले होते. या सामाजिक उपक्रमासाठी पाग ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद ठसाळे, अप्पा जोशी, शेखर शिंदे, श्री. व सौ. रवींद्र बागवे, महावितरणच्या श्रीमती नयना गांधी, सेवानिवृत्त घाडगे मेस्त्री, रवींद्र कदम यांनी सहकार्य केले. गेली चार वर्षे नित्यनियमाने सुरु असलेल्या या सामाजिक उपक्रमात सहकार्य व सहभागी होणाऱ्या मित्रपरिवाराचे धन्यवाद व आभार प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा दिलीप आंब्रे यांनी व्यक्त केले.