वैभववाडी | प्रतिनिधी
करुळ घाटात तीव्र वळणावर ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल १२ तास या मार्गावरील जड व अजजड वाहतूक पूर्णपणे बंद होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना शुक्रवारी राञी १० वा. सुमारास झाली. त्यामुळे करुळ घाटातील वाहतूक भुईबावडा व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती. जे.सी.बी व क्रेनच्या साहाय्याने ट्रक थोडासा बाजुला करुन शनिवारी सकाळी १० वा. सुमारास वाहतुक पूर्ववत सुरु करण्यात आली.
कोल्हापूरहून वैभववाडीकडे येणारा मालवाहक अवजड बारा चाकी ट्रक गगनबावड्यापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असलेल्या करुळ घाटातील तीव्र अवघड वळणात अचानक बंद पडला. ट्रक वळणात मधोमध बंद पडल्यामुळे पूर्ण रस्ता अडवला गेला. त्यामुळे वाहातूक पूर्णपणे बंद झाली होती. ही घटना वैभववाडी पोलिस ठाणेत समजताच पोलिस हवालदार शैलेश कांबळे, पो.काॕ. कृष्णांत पडवळ, श्री जायभाय यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक मधोमध अडकल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीही बाजूने वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रक बाजुला केल्या शिवाय वाहातुक सुरु करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी मागवला. परंतु जेसीबीनेही ट्रक हलत नव्हता. त्यामुळे क्रेन मागवण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने थोडासा ट्रक एका बाजुला घेण्यात आला. तर जेसीबीने दरडी कडच्या बाजुला खणून गाड्या सुटतील एवढा रस्ता मोकळा केला. राञीची वेळ असल्यामुळे हे सर्व होईपर्यंत सकाळी १०.वाजले. त्यानंतर वाहातूक सुरळीत करण्यात आली. माञ तोपर्यंत बंद पडलेला ट्रक घाटात उभाच होता. घाटात अवजड वाहाने व काही खाजगी आराम बस अडकूण पडल्यामूळे प्रवाशी व वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. गगनबावडा व वैभववाडी येथे बॕरिकेट लावून फोंडाघाट व भुईबावडा घाटातुन वाहातूक वळविण्यात आली होती.












