ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्या क्षेत्रातील “बाप माणूस” बना – नितीन धोंगडे

खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालय केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संतोष कुळे | चिपळूण :

समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचे काम वकील करीत असतात. त्यावेळी वकील हे युक्तिवाद करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असतात .समाजामधील वकील बुद्धिजीवी माणूस आहे. मात्र विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेताना जिद्द, परिश्रम आणि स्वतः मधील आत्मविश्वास या गोष्टी महत्वाच्या ठरतात. तरच तुम्ही वकिलीची पदवी प्राप्त करू शकतात. याशिवाय विद्यार्थी ज्या क्षेत्रात पाऊल टाकतील त्या क्षेत्रातला बाप माणूस होण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले पाहिजे. आपल्या नावाचे ठसा तिथे उमटवला तरच तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल, असे प्रतिपादन खेड न्यायालय येथील सरकारी वकील नितीन धोंगडे यांनी सिद्धीयोग महाविद्यालय खेड मधील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर केले.

खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये “भारतीय पुराव्या कायदा अधिनियम १८७२ मधील न्यायालयातील कबुली जबाब “या संदर्भात खेड मधील न्यायालयात काम करणारे सरकारी वकील नितीन धोंगडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. विधी महाविद्यालयातील प्रथम. द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी वकील नितीन धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पुढे बोलताना श्री धोंगडे म्हणाले की , वकील बनण्यासाठी तुमच्याकडे अभ्यास करण्याची जिद्द असली पाहिजे. समाजामधील घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून त्याच्यावर चिंतन करण्याची सवय तुम्हाला असली पाहिजे. एखादी घटना घडते त्या घटने संदर्भात विचार करताना ते कायद्याच्या चौकटीत कशाप्रकारे बसवता येईल यासंदर्भात सुद्धा विचार करण्याची क्षमता ठेवा. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही पाऊल टाकाल त्या क्षेत्रात तुमच्या नावाचा ठसा निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही जर वकील बनवून न्यायालयांमध्ये पैसे कमवण्याचे स्वप्न बाळगून काम केले तर मात्र, तुम्ही यशस्वी होणार नाही. कारण पैशा पेक्षाही तुमच्यासमोर असणारा खटला त्यातील युक्तिवाद आणि त्या व्यक्तीला तुम्ही मिळून दिलेला न्याय ही गोष्ट फार सुखावणारी असते. त्यामुळे कायद्याचा अभ्यास आणि त्यातील बारकावे जाणून घेणे महत्वाचे ठरतात.

यावेळी त्यांनी पुरावा कायद्या संदर्भात माहिती दिली. कलम कन्फेशन म्हणजे काय? ते कोणासमोर केले जाते, त्यातील कोणाचे ग्राह्य धरले जाते, पोलीस कस्टडी, आरेस्ट यातील फरक सुद्धा समजून सांगितला. एखद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस यांना तो कसा पद्धतीने करावा लागतो. यासंदर्भात सखोल माहिती दिली. कलम २७ किती महत्वाचे आहे हे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी श्री. धोंगडे यांनी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगितले की, वकिली करताना तुम्हाला कायद्याचा उत्तम अभ्यास केला पाहिजे. जे आता शिकाल ते भविष्यात तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे. त्यामुळे मन लावून कायद्याचा अभ्यास करा असे त्यांनी सूचित केले. अतिशय कमी वेळा मध्ये त्यांनी विनोदी शैलीचा वापर आणि काही उदाहरणे देत मार्गदर्शन केले . यावेळी प्रा. अनिल दाभाडे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रा. केतकी आठवले, प्रा. सौ. कदम आणि विद्यार्थी उपस्थित होते.