तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड
आबलोली | वार्ताहर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुहागर तालुक्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार असून या मोहिमेसाठी तालुक्यातील 134491इतकी लोकसंख्या निवडली असून या लोकसंख्येमध्ये 34918 इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे.
एकूण 121 इतक्या टीम तयार केल्या गेल्या आहेत. या टीममध्ये सुमारे 242 कर्मचारी व 24 पर्यवेक्षक काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका अशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची व कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास मोफत उपचार केला जाणार आहे.
जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून समाजातील निदान न झालेले कुष्ठ व क्षय रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. लक्षणे असल्यास आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्याकडून मोहिमेदरम्यान जनतेने तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी श्री.घनश्याम जांगीड यांनी केले असून गुहागर तालुक्यातील आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगीड यांनी दिली.