सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रौत्सवा-२०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये.या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी यात्रा नियोजनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनास सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात श्री.देवी भराडी वार्षिक जत्रौत्सव २०२३ व श्री. स्वयंभू देव कुणकेश्वर देवगड वार्षिक जत्रौत्सव -२०२३ नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, कुडाळ प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, मालवण तहसिलदार श्रीधर पाटील, देवगड तहसिलदार स्वाती देसाई, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, गट विकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, विविध विभागांचे प्रमुख, आंगणे कुंटुंबिय, आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, श्री. भराडी देवी आंगणेवाडी जत्रौत्सव ४ फेब्रुवारी व स्वंयभू देव कुणकेश्वर देवगड जत्रौत्सव १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रौत्सवासाठी लाखो भाविक येतील.यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान समित्यांनी समन्वयाने योग्य नियोजन करावे. आंगणेवाडी जत्रौत्सवासाठी कुडाळ प्रांताधिकारी यांची व कुणकेश्वर देवगड जत्रौत्सवासाठी कणकवली प्रांताधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या समन्वय अधिकाऱ्यांनी दक्षता पथकांची स्थापना,स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गंत प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे.जत्रौत्सवापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विषयक रंगीत तालमीचे आयोजन करावे. तहसीलदार मालवण व देवगड यांनी जत्रौत्सवांच्या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियंत्रण कक्षाची उभारणे करणे व योग्य ठिकाणी ठळक दिसणारे फलक लावण्याबाबत कार्यवाही करावी.
आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थान समितीने व्हीआयपी पासेसबाबत नियोजन करावे, दर्शनासाठी जास्तीत जास्त स्वतंत्र रांगाचे आयोजन करावे, जत्रौत्सवासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात पार्किंग मिळावी यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करावी, देवस्थान समित्या कडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या स्वयंसेसकांना ड्रेसकोड देण्यात यावा अशा सूचना देवून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जत्रौत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टॉल व दुकाने यांना परवाना देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात यावी. ग्रामपंचायत विभाग व देवस्थान समितीने मंदिर परिसराची स्वच्छता राहील या बरोबरच होणाऱ्या कचऱ्याबाबत व जत्रा सुरु होण्यापूर्वी व संपल्यानंतर जत्रा परिसराचे निर्जंतुकीरण करण्याचे व्यवस्थापन करावे.पोलीस प्रशासनाने वाहतूकीबाबत व कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधी योग्य ती खबरदारी घेवून नियोजन करावे.पोलीस मदत केंद्रांची स्थापना करावी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त असावा यासाठी नियोजन आणि महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्याची कार्यवाही करावी. आरोग्य विभागाने स्थायी वैद्यकीय व फिरत्या वैद्यकीय पथकांची नेमणूक करावी. यासोबत पुरेसा औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टर व अनुषंगिक कर्मचारी आणि साधनसामुग्रीसह कार्डीयाक ॲब्युलन्स तैनात ठेवावी. नगरप्रशासन विभागाने अग्निशमन यंत्रणा व मोबाईल टॉयलेट उपलब्ध करुन द्यावीत, अशा सूचना देवून त्या म्हणाल्या,परिवहन विभागाने भाविकांसाठी जादा एस.टी बसेसचे नियोजन करावे. बांधकाम विभाग, भारत दूरसंचार निगम, अन्न व औषध प्रशासन,राज्य उत्पादन शुल्क, विद्यूत विभाग व अन्य विभागांवर सोपविलेल्या जबाबदाऱ्या समन्वयाने पार पाडव्यात.
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. फड यांनी सर्वांचे स्वागत करुन विभागनिहाय सोपविलेल्या जबाबदाऱ्या व विषय वाचन केले. जिल्हा प्रशासनाकडून जत्रौत्सवासाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा याबद्दल जत्रोत्सव समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.