देवगड / प्रतिनिधी
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल एक लाख ४२ हजार ५६७ रुपयांचा अवैध गुटखा सापडला आहे. मोंड घाडीवाडी येथील महेंद्रन भास्करन तेवर (४२) याच्या घरावर छापा टाकण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महेंद्रन तेवर हा आपल्या घरात
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला विक्री करण्याच्या
उद्देशाने साठवणूक केल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गला
मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गचे पोलीस
उपनिरीक्षक आर. बी. शेळके, कॉन्स्टेबल के. ए. केसरकर, रवी इंगळे, पोलीस
नाईक एस. एस. खाडये यांच्या पथकाने देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस
उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार राजन जाधव, एफ. जी. आगा, ए. सी.
कदम यांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास महेंद्रन तेवर
याच्या घरावर छापा टाकला. घराच्या पडवीत मोकळ्या जागेत किलतानच्या
पिशव्यांमध्ये अवैध गुटखा साठवणूक केलेला आढळला. यात २३ हजार ६०० रुपये
किंमतीचे प्रिमियम रॉयल दुबई एक्स्पोर्ट क्लॉलिटी गुटख्याचे २३६ पाऊच, ३१
हजार ९२० रुपये किंमतीचे विमल पानमसाल्याचे २६६ पाऊच, ४३ हजार ५६०
रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे २२० पाऊच, १५ हजार ६४२ रुपये
किंमतीचे विमल पान मसाल्याचे ७९ पाऊच, १० हजार ५६० रुपये किंमतीचे
बाजीराव गोल्ड इमेरियन पानमसाल्याचे ८८ पाऊच, २ हजार ६१० रुपये किंमतीचे
मस्तानी टोबॅकोचे ८० पाऊच, ६ हजार ४८० रुपये किंमतीचे व्ही–१ टोबॅकोचे
२१६ पाऊच, ५ हजार ४०० रुपये किंमतीचे महक सिल्व्हर पानमसाल्याचे ४५
पाऊच, १ हजार ३५ रुपये किंमतीचे एम-१ जर्दाचे ४६ पाऊच, १ हजार ७६०
रुपये किंमतीचे व्ही– १ तंबाखूचे ८० पाऊच सापडले. या घटनेची नोंद
देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून संशयिताविरुद्ध कायदेशीर
कारवाई करण्यात आली आहे.