खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्ट्यातून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या डम्परने खारीनजीक दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून डम्पर ताब्यात घेतला. खाडीपट्ट्यातील कर्जी, आमशेत, बहिरवली, मुंबके, सवणस, पन्हाळजे व नांदगाव या भागातून वाळू वाहतुकीचे डम्पर धावत आहेत. या डम्परमुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. बेकायदेशीरपणे वाळू उत्खननासह वाळूची वाहतूक सुरू असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या वाळू वाहतुकीच्या डम्परमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू वाहतुकीच्या डम्परमुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. खाडीपट्ट्यातील खारीनजीक वाळू वाहतुकीच्या डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले. या दोघांवर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी वाळू वाहतुकीचा डम्पर ताब्यात घेतला खाडीपट्ट्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या वाळू उत्खननासह वाहतुकीवर कारवाईची मागणी खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी केली आहे