वेंगुर्ला : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, शिरोडा या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे उद्या २० नोव्हेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मातोंड महसूल मंडळातील सर्व काजू व आंबा उत्पादक शेतकरी यांनी तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या भागातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसानभरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे २०२३-२४ मधील पिक विमा भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असून शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी चालू वर्षी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडलेला असून विमा कंपनीने दोन दिवसात तत्काळ पीक विम्याची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटन शामसुंदर राय, मुकुंद नाईक, प्रवीण नाईक, विठ्ठल आरोलकर यांनी दिला होता. पण अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने उद्याच्या आंदोलनावर शेतकरी ठाम आहेत.










