नुतन कांबळे यांना राज्य गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

वार्ताहर | पाली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांचा राज्यपातळीवरील गुणवंत मुख्याध्यापक, राज्य पुरस्कार हा पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका नुतन नितीन कांबळे यांना फैजपुर, जळगांव येथे आज मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापिका नुतन कांबळे या गेली ११ वर्षे पाली येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून त्यांचे ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे त्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सदर पुरस्कार राज्य अध्यक्ष जे.के. पाटील, अधिवेशन अध्यक्ष विजय पाटील , शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळ सचिव शांताराम पोखरकर तसेच राज्य महामंडळाचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, व तालुका संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन सर्वांना मार्गदर्शन केले व पुरस्कार प्राप्त सर्व मुख्याध्यापक यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका नुतन कांबळे मिळालेल्या पुरस्कारासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, साई अनिरुध्द ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र सामंत, संस्थेच्या संचालिका स्वरूपा सामंत यांनी अभिनंदन केले आहे.