16 MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी

कधी लागणार हा प्रश्न मार्गी?

मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्षात आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) निकाल कधी लागणार, हा एक मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. मागच्या २ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरवर ढकलण्यात आली. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे.

दीड तास झालेल्या २ नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केले असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. विधानसभा अध्यक्ष त्यावेळी म्हणाले होते की, मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय. त्यानुसार अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार आजपासून पुढील सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे.