स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे- अॅड. दीपक पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान पुरस्कार देऊन सन्मान

रत्नागिरी : भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या प्रमाणामध्ये भांडवल निर्मिती करू शकते त्याच प्रमाणात त्याच स्पर्धेला उतरून सहकार चळवळ सुद्धा भांडवल निर्मिती करू शकते, ही प्रत्येकाने आपली बॅलन्सशीट नजरेसमोर आणली की लक्षात येईल. सहकाराची सामूहिक ताकद आहे आणि ही ताकद अशा पद्धतीने भांडवल निर्मितीसाठी उपयोगात आणली पाहिजे. विश्वासार्हता व उपयुक्तता, नवीन तंत्रज्ञान यांचा उपयोग करून अधिक प्रमाणात अर्थकारण गतिमान करावेत, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या वेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह व तीन हजार रुपये असे सन्मानाचे स्वरूप होते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे, कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनचे संचालक संतोष थेराडे, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, संतोष प्रभू उपस्थित होते.

या वेळी अॅड. पटवर्धन म्हणाले की, आज ज्यांचे सत्कार झाले त्यांनी २५ ते ३० वर्षे सहकारात प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांचे योगदान सत्कारास पात्र आहे. आजचे सत्कारमूर्ती म्हणजे सहकार क्षेत्रामधली हिरे माणकं आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या पतसंस्था चळवळ ही स्पर्धेच्या युगामधून जात आहे. आर्थिक जीवघेण्या स्पर्धेमध्ये विश्वासार्हतेद्वारे टिकायचे असून आपली उपयुक्तता वाढवत अधिकाधिक ग्राहक संस्थेबरोबर जोडून अर्थकारण अधिक गतिमान करायचे आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे महाराष्ट्रभर आहे. चळवळीचं भवितव्य हे आपल्या संस्कारावरच अवलंबून आहे. हाउसिंग सोसायटीचं युनिट हे उत्तम पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी संस्कार होऊन विचारमंथन होण्याची गरज आहे.

याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे म्हणाले की, सहकार सप्ताह साजरा करण्याची प्रथम जबाबदारी सहकारी संस्थांची, मातृसंस्थांची व फेडरेशनची आहे. पुढील वर्षापासून प्रत्येक संस्थेने सहकार सप्ताहात फलक लावावेत, ध्वजारोहण करावेत. संचालक, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह ग्राहकांनाही प्रशिक्षणाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांची प्रकर्षाने आठवण येते. ते प्रत्येक वर्षी सहकार दिंडी काढत, व्याख्यान देत, परिसंवाद घडवत. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातही चळवळ वाढली पाहिजे. ज्या चळवळीने आपल्या रोजगार दिला, त्याची आठवण म्हणून सात दिवस सहकार सप्ताह पाळला पाहिजे.

कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनचे संचालक संतोष थेराडे म्हणाले, अॅड. पटवर्धन यांनी सहकार चळवळीत सर्वांना प्रामाणिकपणे मदत केली आहे. जिल्ह्यात जो काही सहकार रुजला त्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. पतसंस्थांची वसुली असो वा नवीन काही परिपत्रक ते मार्गदर्शन करतात.

या वेळी पतसंस्थाचे सीईओ, सेक्रेटरी तसेच गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी अशा प्रातिनिधीक लोकांचा सन्मान केला. व्यवस्थापक मोहन बापट यांनी सूत्रसंचालन केले.

सन्मानमूर्तींची नावे
नागरी, ग्रामीण पतसंस्था- चंद्रशेखर रुमडे (लांजा नागरी पतसंस्था), अनिल विले (मुरली मनोहर पतसंस्था), रविंद्र थेराडे (शिववैभव पतसंस्था), रविंद्र मुंढेकर (भैरी भवानी पतसंस्था), कृतिका सुवरे (महिला पतसंस्था), पराग भाटकर (भंडारी हितवर्धक ग्रामीण पतसंस्था). पगारदार पतसंस्था- सुनिल यादव (ग्रामीण डाकसेवक पतसंस्था), दत्ताराम कोकरे (हॉस्पीटल सेवक पतपेढी), नीलेश चिंगळे (किसान बॅंक), संजय चौधरी (एसटी पतसंस्था), संजय बारिंगे (हिवताप निर्मूलन कर्मचारी पतसंस्था). गृहनिर्माण संस्था- अनुप पेंडसे (रुपाजी हाउसिंग सोसायटी), सुधाकर सावंत (पारस प्लाझा सोसायटी), मिलिंद सावंत (घरकुल गृहनिर्माण संस्था), रघुनाथ गोरे (के. अॅंड एन. क्लासिक सोसायटी).