आचरा रोड वर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी टळणार
भाजपा नगरसेवक शिषिर परुळेकर , शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची मागणी
कणकवली : आचरा रोड येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली या मार्गात वाहतूक कोंडीची मोठी समस्या कित्येक वर्ष भेडसावत आहे. आचरा मार्गावर जाणाऱ्या एसटी फेऱ्या या गांगो मंदिर येथून किनाई रोड द्वारे जर आचरा रोडवर वळवल्यास ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक शिशिर परुळेकर व शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, आपल्या अखत्यारीत एस. टी बस सेवा या मार्गावरून होते. याच मार्गाला समांतर मार्ग म्हणून कणकवली मुंबई गोवा हायवे येथील गांगोमंदिर ते लक्ष्मी चित्र मंदिर हा नवीन मार्ग अस्तित्वात आला आहे. आपण एस. टी बस ची ये-जा करताना आचरा मार्गावरील बस जाण्याच्या या मार्गावरून वाहातुक करण्याचा विचार केल्यास वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. सदर भागातील व्यापारी वर्ग व स्थानिक रहिवाशी यांची अश्याप्रकारची मागणी आहे. आचरा रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही महत्त्वपूर्ण मागणी मार्गी लागल्यास त्याचा मोठा परिणाम वाहतूक कोंडी सुटण्यावर होऊ शकतो. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती श्री परुळेकर यांनी दिली.