आंबोलीत दुचाकीस्वारांकडून जिवंत काडतूसांसह बंदूक ताब्यात

आंबोली दुरक्षेत्र पोलिसांची कारवाई

आंबोली । प्रतिनिधी :
आंबोली पोलीस दुरक्षेत्रावर गुरुवारी रात्री गस्तीच्या वेळी संशयास्पदरीत्या थांबविण्यात आलेल्या दुचाकीस्वारांकडून जिवंत काडतुसांसहित बंदूक आढळून आल्याने त्यांच्यावर आंबोली पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतला. शिकारीच्या निमित्ताने ही बंदूक नेली जात होती का अन्य कारणास्तव याबाबत पोलीस तपास करीत आहेत.गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांकरवी तपासणी करत असताना संशयास्पदरीत्या बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक ( एम एच ०७ एफ ०१५३ ) येताना दिसली.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे व पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी ही मोटरसायकल थांबवली व त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये तपासणी केली असता चार भागांमध्ये विभागून ठेवण्यात आलेली विनापरवाना सिंगल बॅरल काडतुशी बंदूक व दहा जिवंत काडतुसे आढळून आली.या प्रकरणी भानुदास अर्जुन वालावलकर ( ३२ रा. तेंडोली गव्हाळीवाडी कुडाळ ) व ऋत्विक यशवंत परब ( २२ रा. गोवेरी परबवाडी तालुका कुडाळ ) अशी यांना ताब्यात घेण्यात आले.याबाबत अधिक तपास आंबोली पोलीस करत असून हे दोघे शिकारीसाठी आले होते की अन्य कोणत्या कारणासाठी याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.